समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी बुधवारी पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील रामपूरच्या विशेष कोर्टात शरण आले. त्यानंतर कोर्टाने या तिघांनाही दोन मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आझम खान दोन जन्माचे दाखले बनवण्यासह इतर प्रकरणांमधील आरोपांबाबत कोर्टात हजर झाले.

सन २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आझम खान आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक खटले दाखल करण्यात आले होते. असं बोललं जात की, आझम खान यांच्यावर सध्या ८० पेक्षा अधिक खटले सुरु आहेत. यांपैकी अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोर्टाच्या या आदेशांकडे आझम खान यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केले. दरम्यान, त्यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, इथेही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.

यानंतर मात्र आझम खान आपल्या कुटुंबियांसह कोर्टासमोर शरण आले. इतकेच नव्हे कोर्टाने आझम खान त्यांची पत्नी आमदार तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांना अनेक प्रकरणांमध्ये अटक वॉरंट जारी केले होते. आजच्या झालेल्या सुनावणीत कोर्टाने या तिघांनाही सात दिवसांसाठी अर्थात २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

काय आहे प्रकरण?
हा खटला आमदार अब्दुल्ला आझम यांच्या खोट्या जन्म दाखल्याशी जोडलेला आहे. भाजपा नेते आकाश सक्सेना यांनी जानेवारी २०१९ मध्ये अब्दुल्ला यांच्यावर फसवणुकीद्वारे दोन जन्म दाखले बनवल्याचा आरोप केला होता. यासाठी आझम खान आणि त्यांच्या पत्नीने शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविरोधात सक्सेना यांनी एफआयआरही दाखल केली होती. त्यावरुन पोलिसांनी एप्रिल २०१९ मध्ये आझम खान यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर आरोपपत्रही दाखल केले होते. तेव्हापासून कोर्टात हा खटला प्रलंबित आहे. त्याचबरोबर खासदार असलेल्या आझम खान यांच्यावर आजवर ८० खटले दाखल आहेत.