सध्या देशभरात विविध पक्षांमध्ये प्रामुख्याने काँग्रेससह केंद्र सरकारच्या विरोधी पक्षात राजीनामासत्र सुरू आहे. या राजीनामा सत्रात आता आणखी एक भर पडली आहे. कारण, आता समाजवादी पार्टीचे राज्यसभेचे खासदार व माजी पंतप्रधान चंद्रशेखर राव यांचे पुत्र नीरज शेखर यांनी राजीनामा दिला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नीरज हे आपल्या परंपरागत मतदारसंघ असलेल्या बलिया येथुन उमेदवारी मागत होते. मात्र, सपाने त्यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासून नीरज हे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२००७ मध्ये त्यांचे वडील माजी पंतप्रधान चंद्रशेखर राव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बलिया मतदारसंघातुन नीरज यांनी निवडणुक लढवली होती. या पोटनिवडणुकीत नीरज यांना जवळपास ३ लाख मतांनी विजय मिळाला होता. तर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीतही त्यांनी याच मतदारसंघातुन विजय मिळवला होता.