भारतीय जनता पार्टीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघांमध्येच पराभवाची नामुष्की ओढावली आहे. वाराणसीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा दोन प्रमुख जागांवर पराभव झाला. विशेष म्हणजे मागील दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच भाजपाला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला आहे. देशभरातील वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भाजपाचा पक्षाच्या सर्वात प्रमुख नेत्याच्या मतदारसंघामध्येच पराभव झाला. समाजवादी पार्टीने या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव केला. वाराणसीमधील पदवीधर मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे अशुतोष सिन्हा यांनी विजय मिळवला. तर सिन्हा यांचे सहकारी लाल बिहारी शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले. राज्यामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी आणि भाजपाने प्रत्येक दोन जागांवर विजय मिळवला असला तरी वाराणसीमधील भाजपाचा पराभव हा धक्कादायक मानला जात आहे.

आग्रा मतदारसंघामधून भाजपाचे उमेदवार मनविंद्र प्रताप सिंग यांनी तर मेरठमधून दिनेश गोयल यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकली. दुसरीकडे समाजवादी पार्टीचे मान सिंग यादव यांनी अलाहाबाद-झांशीच्या पदवीधर मतदारसंघात विजय मिळवला. यासंदर्भातील माहिती राज्याचे निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांच्या कार्यालयाने दिली आहे.

शुक्रवारी राज्यातील सहा शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकींचे निकालही जाहीर करण्यात आले. यामध्ये भाजपाने तीन जागी तर समाजवादी पार्टीने एका ठिकाणी विजय मिळवला. दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार जिंकून आले. भाजपाचे उमेद द्विवेदी, श्रीचंद्र शर्मा आणि हरी सिंग ढिल्लोण यांनी लखनौ, मेरठ आणि बरेली-मुरादाबाद शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे. तर अपक्षांमध्ये आकाश अग्रवाल यांनी आग्रा आणि ध्रुव कुमार त्रिपाठी यांनी फैजाबाद येथील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जिंकली.

एक डिसेंबर रोजी ११ जागांसाठी मतदान झालं. यामध्ये पाच जागा या पदवीधर मतदारसंघाच्या तर सहा शिक्षक मतदारसंघाच्या होत्या. भाजपाबरोबरच समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि शिक्षक संघाच्या उमेदवारांनी या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उतरवले होते. १९९ उमेदवार या ११ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात होते.