उत्तर प्रदेशच्या सीतापूर येथे नागरिकांच्या मनात भटक्या कुत्र्यांची चांगलीच दहशत निर्माण झालीये. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे येथे अनेक लहान निष्पाप मुलांना जीव गमवावा लागला असून ड्रोनच्या सहाय्याने कुत्र्यांचा शोध घेतला जात आहे. याच मुद्द्यावरुन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे. जे सरकार कुत्र्यांची दहशत थांबवू शकत नाही ते गुंडांची दहशत काय थांबवणार ? अशी बोचरी टीका अखिलेश यांनी योगी सरकारवर केली.

अखिलेश यादव रविवारी अचानक महोबा जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आर्थिक मदत म्हणून २५ हजार रुपये रोख दिले तसेच पक्षाच्या फंडातून १ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या योजनांवर त्यांनी जोरदार टीका केली. मोदी सरकराने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं वचन दिलं होतं, पण २०१४ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी होत नाहीये, असं ते म्हणाले.

या दरम्यान, कर्नाटकात रंगलेल्या राजकीय नाट्याबाबत बोलताना लोकशाहीचा विजय झाला अशी प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला. नैतिकतेच्या आधारे केंद्र सरकारने राजीनाम द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा उल्लेख करताना अखिलेश यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर बोचरी टीका केली. हे सरकार जनतेचं गुडांपासून किंवा गुन्हेगारांपासून रक्षण करण्याचा दावा करतेय, पण जे सरकार कुत्र्यांची दहशत थांबवू शकत नाही ते गुंडांची दहशत काय थांबवणार ? असं ते म्हणाले.