उत्तर प्रदेशमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या माजी कॅबिनेट मंत्री रामगोविंद चौधरी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा दिली आहे. आझम खान आणि शिवपाल यादव यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी पक्षाचा नेत्याची निवड केली आहे. रामगोविंद यांना आमदारांच्या गटाचे नेते म्हणून अखिलेश यादव यांनी निवडल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी माध्यमांना दिली. समाजवादी पक्ष सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्यामुळे रामगोविंद हेच विरोधी पक्षनेते बनतील.

बलियातील बांसडीह मतदारसंघातून निवडून आलेले रामगोविंद हे अखिलेश यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना आझम खान आणि या पूर्वी विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेले शिवपाल यादव यांच्यापेक्षा जास्त महत्व देण्यात आले आहे. आठ वेळा निवडून आलेले रामगोविंद हे पहिल्यांदा १९७७ साली तत्कालीन चिलकहर मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले होते. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. ७० वर्षीय रामगोविंद हे अखिलेश यादव सरकारमध्ये प्राथमिक शिक्षण मंत्री आणि बालविकास, पोषण आहार मंत्री होते. समाजवादी पक्षातील सध्याच्या आमदारांमध्ये ते सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत.
नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. यामध्ये त्यांना अवघ्या ४७ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरही मुख्य विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यात ते यशस्वी झाले. काँग्रेसला ७ जागा मिळाल्या. मंगळवारी अखिलेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली नूतन आमदारांची बैठक होणार आहे. तर बुधवारी मुलायमसिंह यादव हे बैठक घेतील. याबाबत चौधरी यांना विचारले असता त्यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे म्हटले.
निवडणुकीपूर्वी यादव कुटुंबीय आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमधील कलह जगजाहीर झाले होते. पक्ष अखिलेश आणि शिवपाल यांच्या दुभंगली गेली होती. मुलायमसिंह यांनी आपला भाऊ शिवपाल यांच्या पाठराखण केली होती. त्यांनी अखिलेश आणि रामगोपाल यादव यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर रामगोपाल यांनी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलावून अखिलेश यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवले. त्यानंतर निवडणूक चिन्हावरून त्यांच्यातील वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. निवडणूक आयोगानेही अखिलेश यांच्या बाजूनेच कौल दिला होता.