उत्तर प्रदेशातील सत्तारूढ सपाने बुधवारी चार आमदारांची विधिमंडळ पक्षातून निलंबन केले असून पक्षाचा सीतापूर विभाग बरखास्त केला आहे. जिल्हा पंचायतींच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध कृती केल्याचा ठपका ठेवून ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

सीतापूरमधील महेंद्रसिंह ऊर्फ जीन बाबू, अनूप गुप्ता, राधेश्याम जयस्वाल आणि मनीष रावत या चार आमदारांना विधिमंडळ पक्षातून निलंबित करण्यात आले आहे तर सीतापूर विभाग बरखास्त करण्यात आला आहे, असे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

या नेत्यांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोगाची स्थापनाही करण्यात आली आहे. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार रामपाल यादव यांचा पुत्र जितेंद्र याला पंचायत निवडणुकीत मदत केल्याचा ठपका या आमदारांवर ठेवण्यात आला आहे.