जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये घुसखोरी केलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांनी रामगढ सेक्टरमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सांबा सेक्टरमध्ये दहशवादी आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची जोरदार चकमक झाली. यामध्ये तीन जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नागरौटामध्ये घुसलेल्या चार दहशतवाद्यांना टिपण्यातही जवानांना यश आले आहे. नागरौटामधील जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी पहाटे हल्ला केला होता. व्यूहनितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नागरौटात लष्करी तळदेखील आहे. या तळामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून करण्यात आला. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घालत त्यांचे मनसुबे उधळून लावले.

सांबा सेक्टरमधील घुसखोरी दरम्यान पहिल्यांदाच चमलियाल परिसरात पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. चमलियाल भागात बाबा चमलियाल यांची समाधी आहे. पाकिस्तानातील लोकांसाठी बाबा चमलियाल पूजनीय आहेत. त्यामुळेच या भागात पाकिस्तानकडून गोळीबार केला जात नाही. मात्र मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेली असताना पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला.

मध्यरात्रीच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संशयास्पद हालचाली जाणवल्या. यानंतर जवानांनी हा भाग ताब्यात घेतला. याच सुमारास पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबर करण्यात आला. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून कवर फायरिंग देण्यात आले.

दहशतवादी भारतीय हद्दीत घुसल्यावर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार गोळीबार केला. यावेळी दहशतवाद्यांनी एका शेतात आसरा घेत भारतीय जवानांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. अखेर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालत सीमा सुरक्षा दलाने ऑपरेशन यशस्वी केले.

उरीतील दहशतवादी हल्ल्याला भारताने सर्जिकल स्ट्राइक करुन प्रत्युत्तर दिल्यापासून वारंवार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. दरम्यानच्या काळात अनेकदा दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे प्रयत्न केले गेले आहेत. दहशतवाद्यांच्या घुसखोरीवेळी पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला जातो आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी यशस्वी व्हावी, यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत पाकिस्तानने तब्बल २५० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.