करोना परिस्थिती व अर्थव्यवस्थेच्या झालेल्या घसरगुंडीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर हल्ले करताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींविरोधात आक्रमक होत टीका केली. ही टीका करताना राहुल गांधींनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. त्यावरून भाजपानं राहुल गांधींवर हल्लाबोल केला असून, त्यांचा उल्लेख राहुल लाहोरी असा केला आहे.

देशातील करोना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. रुग्णसंख्येचा दर मंदावला असला, रुग्णवाढ ६० ते ७० हजारांच्या सरासरीनं होत आहे. अशात पाकिस्ताननं करोना परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याचं समोर आलं. त्याचा हवाला देत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

राहुल गांधी यांनी भारताची तुलना पाकिस्तान व अफगाणिस्तानसोबत केल्याचं सांगत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी टीकास्त्र डागले आहे. “भारतानं राहुल गांधी यांचं नावं बदललं आहे. ते राहुल गांधी नाहीत, राहुल लाहोरी आहेत. कारण हा विषय भाजपा काँग्रेस असा नाही आहे. हा विषय भारत विरुद्ध पाकिस्तान असा आहे. बदनाम देशासोबत काँग्रेस भारताला का बदनाम करते आहे? भारत कोट्यवधी लोकांचा देश आहे, जिथे सर्व आनंदानं जगत आहेत. धर्माच्या कोणत्याही सीमा नाहीत. भारत एक लोकशाही देश आहे. तुम्ही पाकिस्तानशी तुलना करता. भारताविषयी तक्रारी करता. भारत भीक मागणाऱ्यांचा देश आहे, असं म्हणता. याच वेगानं काम सुरू राहिलं, तर इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल,” अशी टीका संबित पात्रा यांनी केली.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

भारताच्या जीडीपीमध्ये चालू वर्षात मोठी घसरण होणार असल्याचं भाकित आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केलं आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. “भारतातील गरीब भुकेला आहे, कारण सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे”, असं राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं होतं. त्यानंतर “भाजपा सरकारची आणखीन एक जबदस्त कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे करोना परिस्थिती हाताळली आहे,” असा टोलाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला होता.