काडतुसांच्या न्यायवैद्यक चाचणीने तपासाला चालना

धारवाडमध्ये ऑगस्ट महिन्यात ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी मिळालेली बंदुकीतील काडतुसे आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी मिळालेली बंदुकीची काडतुसे यांची न्यायवैद्यक चाचणी केली असता या काडतुसांच्या आधारे या तिन्ही हत्यांतील समान दुवे प्रकाशात येत असल्याचे समजते. या तिघांची हत्याही समान मारेकऱ्यांकडूनच झाल्याच्या तर्काला या पुराव्यांमुळे बळकटी मिळत आहे.
हत्या झालेल्या तिघांमधील वैचारिक समानता, हत्येमागील संभाव्य उद्देशातील समानता, हत्या करण्याची पद्धत आणि हत्येसाठी वापरण्यात आलेली ७.६५ एमएम देशी बनावटीचे शस्त्र या आधारावर या तिन्ही हत्यांतील समानतेचा दुवा याआधी शोधला जात होता. मात्र या काडतुसांच्या चाचणीतून प्रथमच वस्तुनिष्ठ पुरावाही उपलब्ध झाला आहे.
दाभोलकर यांची हत्या पुण्यात २०१३ मध्ये झाली त्यांच्या शरीरावर ७.६५ एमएम देशी बनावटीच्या पिस्तुलाने चार गोळ्या झाडण्यात आल्या, तर पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर ७.६५ एमएम देशी बनावटीच्या पिस्तुलातून पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या दोन्ही प्रकरणांत मारेकरी दुचाकीवरून आले होते. कलबुर्गी यांची हत्या त्यांच्या निवासस्थानीच करण्यात आली आणि त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी ७.६५ एमएम देशी बनावटीच्या पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या.
प्रत्यक्ष घटनास्थळी मिळालेल्या काडतुसांच्या न्यायवैद्यक चाचणीतून आता असे समोर आले आहे की, कलबुर्गी आणि पानसरे हत्या आणि दाभोळकर-पानसरे हत्या ज्या शस्त्रांनी करण्यात आली त्यांचा एकमेकांशी संबंध आहे. कलबुर्गी आणि पानसरे प्रकरणात जी काडतुसे हस्तगत करण्यात आली ती सारखीच असल्याचे न्यायवैद्यक चाचणीतून समोर आले आहे. या तिन्ही प्रकरणांत साम्य असल्याचे काडतुसांवरून स्पष्ट होत आहे, मात्र ही बाब मारेकऱ्यांची ओळख पटण्यास पुरेशी नाही, असे कर्नाटकच्या एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
कलबुर्गी आणि पानसरे प्रकरणांत काडतुसे सारखीच असली तरी पानसरे यांच्या हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या काडतुसांचा दुसरा संच आणि दाभोलकर यांच्या हत्येच्या ठिकाणी सापडलेली काडतुसे एकच असल्याचे स्पष्ट होत आहे. तथापि, दाभोलकर यांच्या हत्येच्या ठिकाणी मिळालेली काडतुसे आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या ठिकाणी मिळालेली काडतुसे मिळतीजुळती नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. मारेकऱ्यांनी या हत्या करताना प्रत्येकी दोन शस्त्रांचा वापर केल्याचाही संशय आहे.
न्यायवैद्यक चाचणी आणि हातांचे ठसे शोधण्याचे तंत्रज्ञान यांनी तिन्ही हत्यांचा एकमेकांशी संबंध जोडणारा पुरावा उपलब्ध करून दिला आहे. कलबुर्गी हत्येचा तपास प्रगतिपथावर आहे, तपास पूर्ण होईपर्यंत त्याचा सविस्तर तपशील देता येणार नाही, असे कर्नाटकचे महासंचालक (गुन्हा अन्वेषण) एच. सी. किशोरचंद्र यांनी सांगितले. काडतुसांमध्ये साम्य आढळले असले तरी या हत्यांमध्ये कोणता गट सहभागी आहे ते ओळखण्यास ही बाब पुरेशी नाही, असे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.

‘त्या’ चौघांचा शोध सुरू
सीबीआय, महाराष्ट्राचा विशेष तपास गट आणि कर्नाटक गुन्हा अन्वेषण विभाग या यंत्रणांकडून या तिन्ही हत्यांचा वेगवेगळ्या पातळीवर तपास झाला आहे आणि सुरू आहे. या तपासात चौघां संशयितांवरही लक्ष केंद्रित झाले आहे. यातील जयप्रकाश ऊर्फ अण्णा आणि रूद्र पाटील हे कर्नाटकातील तर सारंग कुलकर्णी ऊर्फ सारंग अकोलकर आणि प्रवीण लिमकर हे दोघे महाराष्ट्रातील असून सनातन संस्थेशी संबंध असलेले हे चौघे २००९पासून फरारी आहेत. हे चौघे नेपाळला गेल्याची खबर होती, मात्र ते २०१४मध्ये मायदेशी परतल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला मिळाली आहे.