समलैंगिकतेला देशात कायदेशीर दर्जा देण्याबाबत न्यायव्यवस्थेमध्ये संभ्रम असताना आणि केंद्र सरकारने याविषयी नवीन कायदा केला नसतानाच आरोग्य मंत्रालयाच्या एका पुस्तिकेमध्ये समलैंगिकतेवर भाष्य करण्यात आले आहे. किशोरवयात भिन्नलिंगी किंवा समलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होणे साहजिकच आहे असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने किशोरवयीन मुलांचे आरोग्य आणि मानसिक अवस्था यावर संसाधन साहित्य तयार केले आहे. यामध्ये किशोरवयातील मानसिकेतवर भाष्य करण्यात आले आहे. ‘किशोरवयीन मुलामुलींनी प्रेमात पडणे साहजिक असते. त्यांना समलिंगी किंवा भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटण्यात गैर काहीच नाही. पण यात आदर आणि सहमती महत्त्वाचीअसते’ असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यात गैर काहीच नाही. पण त्या मांडताना आदर करणे महत्त्वाचे आहे. एखाद्या मुलीने नकार दिल्यास तिच्या भावनाही मुलांनी समजून घेतल्या पाहिजे. तिचा नकार हा नकारच असतो असे यात म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाचे ही पुस्तिका देशातील विविध राज्यांमध्ये वितरीत केली जाणार आहे. देशात २६ कोटी किशोरवयीन मुलंमुली आहेत. केंद्र सरकारने यातील १.६५ लाख किशोरवयीन मुलांपर्यंत ‘साथिया’ या उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यात किशोरवयीन मुलांना आरोग्याविषयीची माहिती देणे तसेच जनजागृती केली जाणार आहे. माध्यमांचा प्रभाव असला तरी किशोरवयीन मुलांचे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. या सर्व प्रश्नांना साथिया या उपक्रमाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव सी के मिश्रा यांनी सांगितले. यामध्ये मुलांनी रडण्यात काहीच गैर नाही असा उल्लेख करण्यात आला आहे. भावना व्यक्त करण्यासाठी मुलंही रडू शकतात. मुलंही लाजू शकतात किंवा सौम्य भाषेत बोलू शकतात. उद्धटपणे किंवा असभ्यपणे बोलणे हे पौरुषत्व ठरत नाही असा उल्लेखही आरोग्य मंत्रालयाच्या पुस्तिकेमध्ये करण्यात आला आहे.