दक्षिण कोरियातील एका न्यायालयाने सॅमसंग या जगातील सर्वांत मोठ्या मोबाइल निर्मात्या कंपनीचे उत्तराधिकारी जे-वाय-ली यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावली. एका घोटाळ्यात लाच दिल्याचा ली यांच्यावर आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणात पार्क ग्यून यांना राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागले होते.

दरम्यान, ली यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. जगातील सर्वाधिक स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे ली हे उत्तराधिकारी असून त्यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. लाच देणे, अफरातफरी करणे आणि विदेशात संपत्ती लपवण्याचा आरोपही आहे. हे सर्व आरोप ली यांनी फेटाळले आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर सॅमसंग कंपनीच्या शेअर्समध्ये १.२ टक्क्यांनी घसरण झाली.

याच प्रकरणी पार्क ग्यून यांना दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडावे लागले होते. या हायप्रोफाइल प्रकरणाची सुनावणी मार्च महिन्यात सुरू झाली होती. फेब्रुवारीपासून तुरूंगात असलेल्या ४९ वर्षीय ली यांना सिओल येथे शिक्षा सुनावण्यात आली. तत्कालीन राष्ट्राध्यक्षांना लाखो डॉलरची लाच दिल्याचा ली यांच्यासह सॅमसंगच्या इतर चार अधिकाऱ्यांवरही आरोप होता. ज्या करारासाठी ली यांनी लाच दिली होती. तो करार त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. या माध्यमातूनच ते सॅमसंगच्या प्रमुखपदी विराजमान होणार होते. सध्या त्यांचे वडील ली-कुन हे सॅमसंग समूहाचे अध्यक्ष आहेत.

ली यांनी ६.४ बिलियन कोरियन वोनची अफरातफर केल्याचे वृत्त दक्षिण कोरियन माध्यमांत आले आहे. सरकारी वकिलांनी ली यांना १२ वर्षांच्या शिक्षेची मागणी केली होती. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. या निकालाची अंतिम सुनावणी २०१८ मध्ये होईल.