पुरोगामी विचारवंत आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी म्हणून संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या सनातन संस्थेला धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांना जीवे मारण्याची धमकी या पत्राद्वारे देण्यात आल्याचा दावा गोवा येथील संस्थेच्या मुख्यालयाकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी संस्थेकडून मंगळवारी पोंडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.


सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांच्या म्हणण्यानुसार, आठवले यांना जीवे मारण्याबरोबरच पोंडा येथील संस्थेच्या आश्रमातील महिला साधकांवर हल्ला करण्याची धमकीही यात देण्यात आली आहे. इंग्रजी भाषेत टाईप केलेले हे एक पानी पत्र बंगळूरू येथून पाठवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे पत्र पोस्टाच्या माध्यमातून संस्थेला मिळाले. त्यानंतर सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त विरेंद्र मराठे यांनी पोंडा पोलिसांत धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे, असे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

जीवे मारण्याच्या धमकीसह हल्ला करण्याबाबतची तक्रार आमच्याकडे पोहोचली असून आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत, असे पोलीस निरिक्षक हरिष मादकैकर यांनी सांगितले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक डॉ. विरेंद्र तावडे सीबीआयच्या कोठडीत आहे. तसेच, २०१५ मध्ये झालेल्या कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांकडून तावडेची चौकशी सुरु आहे.

सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात २० ऑगस्ट २०१३ रोजी बंदूकीतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर, याच पद्धतीने कॉ. गोविंद पानसरे यांची २० फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात पानसरे यांच्या पत्नीही जखमी झाल्या होत्या.