सेक्स स्कँडलमुळे आपले मंत्रीपद गमवावे लागलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) माजी सदस्य संदीप कुमार यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. सीडीत असलेल्या महिलेशिवाय इतर काही महिलांसोबतही संदीप कुमार यांचे संबंध असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरही संदीप कुमारच्या बहाण्याने दिल्ली सरकार व अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आता यात भर पडली आहे अभिनेता खासदार परेश रावल यांची. त्यांनी आपचा उल्लेख पाप असा करत ‘बोटी के बदले राशन’ ही शासन चालवण्याची नवी पद्धत असल्याचे म्हटले आहे.
‘पाप पार्टी पेश करती है…नया तरीका शासन का..बोटी के बदले राशन का’ असे ट्विट परेश रावल यांनी केले आहे. संदीप कुमार यांनी रेशन कार्डचे देतो असे सांगून अंमली पदार्थ देऊन आपले शारीरिक शोषण केले होते, असा आरोप त्या आक्षेपार्ह सीडीतील महिलेने केला होता. त्या महिलेच्या तक्रारीनंतर शनिवारी (दि. ३) पोलिसांनी संदीप कुमारला अटक केली होती.
सोमवारी न्यायालयाने संदीप कुमार यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. इन कॅमेरा त्यांचा जबाब नोंदवला जात आहे. संदीप यांनी आणखी काही महिलांचे शोषण केल्याची शक्यता असल्यामुळे पोलीस कोठडी मागितल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 3:19 pm