दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ सिनेमावरून गोंधळ सुरू असतानाच एका नव्या विषयावरून देशात पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार आहे. ‘फर्स्टपोस्ट’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

संघाचे म्हणणे आहे की, चित्रपट हे समाजाचा आरसा असतात. याद्वारे सामाजिक आणि बौद्धिक बदल घडवून आणला जाऊ शकतो. त्याचबरोबर चित्रपटच सशक्त माध्यम आहे ज्याद्वारे आजच्या तरुण पिढीमध्ये उत्कृष्ट सामाजिक मूल्ये आणि संस्कार रुजवले जाऊ शकतात. त्यामुळेच संघ आता या दृष्टीने हळूहळू पुढे जात आहे.

यापूर्वी वेळोवेळी संघाच्यावतीने विविध चित्रपटांवर टिपण्णी करण्यात आली आहे. मात्र, या क्षेत्रात पदार्पणाचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या पुस्तकावर आधारित राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्यावरील चित्रपट बनवण्यात आला होता. ‘एक थी रानी ऐसी भी’ या नावाने हा सिनेमा आला होता. यामध्ये भाजपच्या खासदार हेमा मालिनी आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला संघ परिवाराचा पाठिंबा होता.

त्यानंतर आता संघ बॉलिवूडमध्ये आपला जम बसवण्याच्या प्रयत्नात आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. यासाठी पहिले पाऊल म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. संघाच्या या महोत्सवात नाच-गाणी असणारे व्यावसायिक सिनेमे नसतील तर संस्कार आणि भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटांचा समावेश असेल. या चित्रपट महोत्सवासाठी संघाने ‘भारतीय चित्र साधना’ नावाची नवी संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमांतून देशातील विविध भागात चित्रपट महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिल्लीमध्ये १९ डिसेंबरला अशा प्रकारे पहिल्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर, मुंबई, कोलकाता, जयपूर आणि दक्षिण भारतातील शहरांमध्येही चित्रपट महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे.