लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चांवर अभिनेता संजय दत्तने स्पष्टीकरण दिलं आहे. मी निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही असं त्याने ट्विटरवर म्हटलंय. संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण आता संजयच्या या ट्विटमुळे त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

‘मी निवडणूक लढवणार नाही. पण माझ्या देशासोबत मी खंबीरपणे उभा राहीन आणि माझी बहीण प्रिया दत्त हिलासुद्धा साथ देईन. देशासाठी मतदान करण्याचं आवाहन मी प्रत्येकाला करतो,’ असं ट्विट त्याने केलंय.

२००९ साली जेव्हा संजय दत्तने राजकारणात प्रवेश केला, तेव्हा राज्यसभा खासदार अमर सिंह यांच्या आग्रहाखातर त्याने ‘सपा’मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी संजय दत्तने लखनौ येथून निवडणूक लढविण्याची घोषणा देखील केली होती. परंतु काही कारणास्तव तो निवडणूक लढवू शकला नाही. नंतर अमरसिंह यांनी समाजवादी पक्षाला रामराम केल्यानंतर संजय दत्तनेही पक्षाशी फारकत घेतली.

संजय दत्तचे वडील सुनील दत्त काँग्रेस खासदार होते. तर बहिण प्रिया दत्तदेखील काँग्रेसकडून खासदार झाल्या आहेत.