बॉलिवूडचा मुन्नाभाई अर्थात अभिेनेता संजय दत्त पाच राज्यांचा अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेचा ब्रॅन्डअॅम्बेसिडर होणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी रविवारी ही माहिती दिली. उत्तराखंडसह हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान तसेच चंदिगड आणि दिल्ली या दोन केंद्र शासित प्रदेशांचा मुन्नाभाई ब्रॅन्ड अॅम्बेसिडर असणार आहे.

रावत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संजय दत्त यांच्याशी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर नियुक्तीबाबत फोनवरुन सविस्तर बोलणे झाले असून आमच्या विनंतीला त्यांनी सहमती दर्शवली आहे. अॅम्बेसिडरच्या माध्यमांतून या मोहिमेद्वारे ड्रग्जविरोधात जनजागृती करण्यात माझा हातभार लागेल याचा आनंद असल्याचे संजय दत्त यांनी म्हटले आहे.

संजय दत्त स्वतः आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अंमलीपदार्थांच्या आहारी गेले होते. यामुळे त्यांना खूपच त्रास सहन करावा लागला. मात्र, यावर योग्य उपचार आणि समुपदेश केल्यामुळे त्यांना या जीवघेण्या सवयीतून बाहेर पडता आले. आपल्या या अनुभवाचा फायदा अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेसाठी करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारने अंमलीपदार्थ विरोधी मोहिम खासकरुन उत्तर भारतातील काही राज्यांसाठी हाती घेतली आहे. येथील पाच राज्यांमध्ये लहान मुले आणि तरुणांना अंमलीपदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवण्यासाठी याचे कोणते आणि कसे दुष्परिणाम होतात याची माहिती देण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे. ज्या पाच राज्यांमध्ये ही मोहिम राबवण्यात येणार आहे. त्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रतिनिधींनी २० ऑगस्ट रोजी एका विशेष बैठकीत अंमलीपदार्थ्यांविरोधात रणनितीवर चर्चा केली होती.