नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या कटुतापूर्ण संबंधांमुळे भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या संजय जोशी यांच्या फलकबाजीमुळे मंगळवारी पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला . दिल्लीतील या पोस्टर्सच्या माध्यमातून रमजान ईदच्या निमित्ताने पाकिस्तान आणि बांगलादेशला शुभेच्छा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेटपणे लक्ष्य करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींना पाकिस्तान आणि बांगलादेशविषयी इतकी आत्मीयता वाटते. मात्र, स्वपक्षातील नेत्यांबद्दल पंतप्रधानांच्या मनात इतकी कटुता का, असा परखड सवाल या फलकांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. “पाकिस्तान को रमजान पर देते है बधाई, सुषमा, अडवाणी, संजय जोशी, सिंह, गडकरी और मुरली मनोहर जोशी के लिए मन मे है खटाई” असे या पोस्टर्सवर लिहिण्यात आले आहे. सबका साथ, सबका विकास हा नारा देणारे सरकार पक्षातील सर्व नेत्यांना बरोबर का घेत नाही. त्यामुळे जनतेने तुमच्यावर विश्वास का ठेवावा, असा सवालही पोस्टर्सच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे ही पोस्टर्स लावण्यासाठी सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी आणि अमित शाह यांच्या घरासमोरील जागा निवडण्यात आली आहे. एकेकाळी संजय जोशी यांचा भाजपमध्ये प्रचंड दबदबा होता. मात्र, २००५ साली झालेल्या सीडी प्रकरणामुळे त्यांना पक्षातील पदांचा राजीनामा द्यावा लागला होता.