अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची चर्चा देशभरात सुरू आहे. अयोध्येत पायाभरणीच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असून, ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशीद प्रकरणावरून भाजपातील वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी द इकॉनामिक टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत संजय राऊत यांनी राम मंदिर भूमिपूजन व बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यावर भाष्य केलं आहे. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयानं भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी अलिकडेच तारीख निश्चित केली. त्याविषयी बोलताना राऊत म्हणाले,”आडवाणीजी व जोशीजी यांना या वयात सीबीआय न्यायालयात ओढलं जात असताना, मला हे कळत नाही की, केंद्र सरकार हा खटला का सुरू ठेवत आहे? हे अक्षम्य आहे,” असं राऊत म्हणाले.

आणखी वाचा- “राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाच बरखास्त केला तर शहीद झालेल्यांना मानवंदना ठरेल”

“सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिराच्या उभारणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निकाल दिला आहे. मग वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतरांना न्यायालयात जाऊ देण्यापेक्षा बाबरी मशीद विध्वंस प्रकरण बंद करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारनं कशामुळे रोखली आहे?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायला हवं – गोविंदगिरी महाराज

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी राऊत यांनी आणखी एक मोठं विधान मुलाखतीत बोलताना केलं. “दुसरी गोष्ट म्हणजे भाजपा एक पक्ष म्हणून आणि त्यांचे वरिष्ठ नेते आतातरी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी कारसेवकांच्या समूहाला दोष देण्यापेक्षा आतातरी बाबरी मशीद आम्हीच पाडली हे सांगण्याचं धाडस का दाखवत नाही?,” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.