शिवसेना खासदार राऊत यांचा गंभीर आरोप

शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी आणि मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तब्बल पन्नास हजार कोटी रूपयांची उधळण केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने बुधवारी केला. एवढय़ा अवाढव्य रकमेतून केंद्राकडे हात न पसरता महाराष्ट्रातील शेतकरयांची कर्जमाफी सहज करता आली असती, अशी जहाल टीका शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली.

‘आठ दिवसांत तीस शेतकरयांनी आत्महत्या केल्या. हा सगळा प्रकार लाजीरवाणा आहे. प्रगत महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेट ट्रेन, मेट्रो प्रकल्पांची भाषा करतात. पण शेतकरयांच्या कर्जमाफीला नकार देतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कर्जमाफी करू शकतात; तर मग फडणवीसांना काय अडचण आहे? पण कर्जमाफीसाठी मन मोठे असावे लागते आणि निवडणूक जुमला नसल्याचे दाखवून द्यवे लागते,’ असे राऊत म्हणाले.

शेतकरी देशोधडीला लागलेत. त्यांच्या सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका, असे सांगून ते म्हणाले, ‘मोदींबरोबर फडणवीसांचे पुत्रवत संबंध असल्याचे सांगितले जाते.. मग आणा ना केंद्राकडून मदत आणि मोदींना हात दिलाच नाहीच नाही तर तुम्ही स्वत:च्या हिंमतीवर कर्जमाफी द्य. कारण कर्जमाफी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यापासून फडणवीसांना पळता येणार नाही.’

योगींची दिशा योग्य, आता राज्याराज्यांत भेद नको

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने शेतकरयांची कर्जे माफ करण्याचा घेतलेला निर्णय तोकडा आहे; परंतु दिशा योग्य असल्याचे कौतुक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केले. ‘अखेर भाजपला कर्जमाफीची सुबुद्धी सुचली, हे बरेच झाले. पण देशातील कृषी क्षेत्र संकटाखाली आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. त्यामुळे आता भाजपने राज्याराज्यांमध्ये भेदभाव न करता सार्वत्रिक निर्णय घेतला पाहिजे,’ असेही त्यांनी नमूद केले.