काही राज्यांमध्ये काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झाल्याने काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  ही सगळी चर्चा सुरू असताना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अचानक राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली आहे. ही भेट पंजाब विधानसभेच्या अनुषंगाने असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, या बैठकी प्रशांत किशोर, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“प्रशांत किशोर काँग्रेस नेत्यांना भेटत असतील हा तर त्यांचा पक्षाचा वैयक्तिक विषय आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला प्रशांत किशोर यांच्याकडून मदत झाली. गेल्या काही दिवसात ते शरद पवारांना सुद्धा भेटले आहेत. त्यासंदर्भात शरद पवारांकडून किंवा गांधी कुटुंबाकडून कोणती माहिती समोर आली नाही. तुम्ही जे सगळं सांगता आहात त्या हवेतल्या फैरी आहेत. प्रशांत किशोर ही निवडणूकांमध्ये काम करतात. मात्र नक्की ते काय करतायत याच्याविषयी अधिकृतरित्या बाहेर आलेलं नाही,” असं संजय राऊत एबीपी माझासोबत बोलताना म्हणाले.

काँग्रेसचं मिशन २०२४; राहुल गांधी-प्रशांत किशोर यांच्यात महत्त्वाची चर्चा; बैठकीत प्रियांका गांधींचाही सहभाग

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी देशातील विरोधी पक्षाचा चेहरा कोण असेल याबाबतही भाष्य केलं. “आपल्या देशामध्ये विरोधकांची एकजूट ही एक गहण समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येक राज्यातला विरोधी पक्ष स्वतःला बादशाहा मानतो. अशा मानसिकतेमध्ये सर्वांची एकजूट होणे ही जरी गरज असली तरी त्या एकजूटीला नेता असणे गरजेचे आहे. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी जेव्हा विरोधी पक्षांचा पराभव केला तेव्हा विरोधी पक्षाला जबाबदार चेहरा मिळाला. याक्षणी असा चेहरा कोण आहे हे विरोधी पक्षांनी एकत्र बसून ठरवलं पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्ष एकत्र यायला पाहिजे. विरोधी पक्षामध्ये फूट असेल तर आघाडी कशी काय जन्माला घालणार, असे संजय राऊत म्हणाले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र, त्यांच्या नावाची जास्त चर्चा सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीपासून सुरु झाली. शरद पवारांची दोन वेळ भेट घेतल्यानंतर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली.