गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न शिवसेनेच्या गोटातून सुरु झाले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि सुभाष वेलिंगकर यांच्यात गोव्यामध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली असून संजय राऊत यांनीदेखील भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या भेटीचे राजकीय अर्थ काढू नये असेही शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गोव्यातील संघाचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी भाजपविरोधी वक्तव्य केल्याने त्यांची संघातून हकालपट्टी करण्यात आली होती. भाजप यंदा गोव्याची निवडणूक जिंकू शकणार नाही असे विधान त्यांनी केले होते. वेलिंगकर यांची हकालपट्टी करताच संघाच्या ३०० कार्यकर्त्यांनी राजीनामा देत वेलिंगकरांना पाठिंबा दर्शवला होता. मातृभाषेतून शिक्षण द्यावे आणि इंग्रजी शाळांना मिळणारे अनुदान बंद करावे अशी वेलिंगकर यांची मागणी आहे. वेलिंगकर यांच्या या मागणीला शिवसेनेने यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. मातृभुमी व मातृभाषेच्या रक्षणासाठी चळवळ उभारणाऱ्या वेलिंगकरांना पदावरून हटवून भाजपने मराठी व कोकणी लोकांशी द्रोह केल्याचा आरोप शिवसेनेने मुखपत्रातून केला होता.

वेलिंगकर यांनी संघातून बाहेर पडून भाजपविरोधात निवडणूक लढण्याची तयारीही केली आहे. यासाठी गोवा प्रांताचा स्वतंत्र संघही स्थापन केला आहे. तर शिवसेनाही गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहे. संजय राऊत यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शनिवारी गोव्यामध्ये वेलिंगकर यांच्याशी चर्चा केली. तब्बल दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. भाजपविरोधात वेलिंगकर यांना जवळ करण्याची खेळी शिवसेनेने आखली आहे. संजय राऊत यांनी भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला. सध्या गोव्यात असून मुंबईत आल्यावर बोलू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली आज समर्थकांची सभा पार पडली. या जाहीर सभेत भाजपला पराभूत करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे. या सभेला सुमारे २ हजार लोकांची उपस्थिती होती. त्यामुळे वेलिंगकर यांचे बंड हे आगामी निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

वेलिंगकर यांचे महत्त्व

सुभाष वेलिंगकर यांची गोव्यात संघउभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. १९९६ मध्ये विभाग संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी १० महिन्यांचा कारावासही भोगला होता. मनोहर पर्रिकर, श्रीपाद नायक आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या वाटचालीत वेलिंगकर यांनी भरीव योगदान दिले आहे.