उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन धोरण जाहीर केलं आहे. या धोरणानुसार उत्तर प्रदेशमध्ये दोनच अपत्यांची सक्ती केली जाणार आहे. मात्र, या धोरणाना विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आहे. हिंदूंचा जन्मदर २ टक्क्यांच्या खाली आणणं त्यांना मान्य नाही. त्यासोबतच राजकीय वर्तुळातून देखील या धोरणावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर खोचक टिप्पणी केली आहे. “लोकसंख्येच्या स्फोटामुळे महागाईपासून बेरोजगारीचे अराजक निर्माण झाले. शिक्षण, आरोग्य याबाबत व्यवस्था निर्माण करण्यात सरकार अपुरे पडले. आता करून भागले आणि लोकसंख्या नियंत्रणाला लागले”, अशा शब्दांत संजय राऊतांनी लोकसंख्या धोरण, योगी सरकार आणि भाजपावर टीका केली आहे. ‘सामना’च्या रोखठोक या सदरामध्ये त्यांनी भाजपावर या धोरणावरून निशाणा साधला आहे.

…तर भाजपाचे १६० आमदार बाद होतील!

दरम्यान, संजय राऊत यांनी या लेखामध्ये उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला देखील खोचक टोला लगावला आहे. “विटंबना म्हणा किंवा विडंबना, योगी महाराजांनी उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लावलाच, तर भारतीय जनता पक्षाचे १६० आमदार बाद होतील. कारण या आमदारांना दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत. खासदार रवी किशन हे लोकसभेत लोकसंख्या नियंत्रणाचे खासगी विधेयक मांडून चर्चा घडवणार आहेत. पण स्वत: रवी किशन यांनाच चार अपत्ये आहेत. आता काय करायचे?”, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

सरकार सुविधा देण्यात कमी पडले!

लोकसंख्येसाठी सुविधा देण्यात सरकार कमी पडल्याची टीका या लेखात संजय राऊतांनी केली आहे. “कोणत्याही देशाची मोठी लोकसंख्या ही ताकद किंवा वरदान मानले जाते. पण त्या लोकसंख्येचा सदुपयोग झाला नाही, तर तीच लोकसंख्या अभिशाप बनून अराजकास निमंत्रण देते. हिंदुस्थानसह जगातील अनेक देशांत लोकसंख्येच्या समस्येने भूक, बेरोजगारी, महागाईसारखे भस्मासूर उभे केले आहेत. पण या लोकसंख्येसाठी रोटी, कपडा, मकान या सुविधा निर्माण करणे सरकारला कठीण होत चालले आहे. चीननं वन चाईल्ड धोरण बंज करून टू चाईल्ड पॉलिसी आणि आता थ्री चाईल्ड पॉलिसी असा बदल केला. ही वेळ त्यांच्यावर का आली, याचा विचार हिंदुस्थानच्या राज्यकर्त्यांनी करायला हवा. हिंदुसथानच्या वाढत्या लोकसंख्येला अन्न, पाणी, निवास, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवताना सरकार कमी पडले”, असं संजय राऊतांनी या लेखात नमूद केलं आहे.