News Flash

भाजपाने चार द्यावेत, पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील; शिवसेनेचा इशारा

"हे पांचट विनोदाचे लक्षण आहे."

संग्रहित छायाचित्र

एनडीएतून बाहेर पडल्यापासून भाजपा-शिवसेनेत सातत्यानं शाब्दिक चकमकी झडत आहेत. सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी भाजपाकडून जात नसल्याचं चित्र आहे. शिवसेनेकडूनही केंद्रातील भाजपा सरकारच्या कारभारावर सातत्यानं टीका केली जात असून, पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत भाजपाला इशारा दिला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मोदींनी त्यावर भाष्य केलं होतं. पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानावरून शिवसेनेनं मोदींना सामना अग्रलेखातून लक्ष्य केलं आहे. “मोदी हे ‘मन की बात’मधून आकाशवाणी करतात. म्हणजे त्यांना मनदेखील आहे. मोदी यांनी आता त्यांचे नवे दुःख लोकांसमोर मांडले आहे. दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारत असतात व माझा अपमान करतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत, असे मोदी यांनी सांगितले आहे हे धक्कादायक आहे. आपल्या पंतप्रधानांचा अपमान कोण करीत आहे? पंतप्रधानांचा अपमान करण्याइतका प्रबळ विरोधी पक्ष विद्यमान राज्यकर्त्यांनी शिल्लक ठेवला आहे काय? काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वास आपण गांभीर्याने घेत नसल्याचे भाजप पुढाऱ्यांनी एका बाजूला सांगायचे व त्याचवेळी राहुल गांधी आमचा अपमान करतात, असे दुसऱ्या तोंडाने बोलायचे हे पांचट विनोदाचे लक्षण आहे. विधायक टीका करणे, सरकारच्या खोटेपणावर बोलणे यास राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला आहे,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

“सध्याच्या राजवटीत लोकांच्या शेळ्या झाल्या आहेत. शेळ्या झालेले एकमेकांना सांगत आहेत की, ‘मेंढपाळाने छान व्यवस्था केली.’ ही व्यवस्था म्हणजेच आनंद, सुख मानण्याची गोष्ट नाही. सरकारला शेळ्यांची व्यवस्था करायची आहे व त्या व्यवस्थेवर शेळ्या खूश असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण इतरांनीही शेळ्या-मेंढ्या व्हावं हा त्यांचा आग्रह चुकीचा आहे. वाघ, लांडगे, हत्ती, सिंह यांनीही शेळ्या-मेंढ्यांसारखे बॅss बॅss करावे व कोणी गर्जना केली तर तो अपमान, ही लोकशाही नाही. यालाच लोकशाही म्हणावे, असा दबाव टाकणाऱ्यांना लोकशाही शिकवायची गरज आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

राज्य मिळाले आहे ते नीट चालवा!

“मोदी हे जागतिक स्तरावरील मोठे नेते आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी मारलेल्या टोमण्यांची दखल घेण्याची त्यांना गरज नाही. राहुल गांधी यांना गेल्या सहा वर्षांत या मंडळींनी मारलेले टोमणे एकत्र केले तर मोठे ग्रंथ निर्माण होतील. राहुल गांधींचा उल्लेख ‘पप्पू’ असा करणाऱ्यांनी दुसऱ्यांनी मारलेल्या टोमण्यांची धास्ती का बाळगावी? पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात ज्या भाषेचा वापर सध्या सुरू आहे, त्यास काय म्हणावे? शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवरही अधूनमधून टोमणेबाजी सुरूच असते. राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावेत. भाजपाची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱ्यांनी याची तयारी ठेवायलाच हवी. मोदी सरकारचे भाग्य असे की, आज विरोधी बाकावर मधु लिमये, मधु दंडवते, लोहिया, जनेश्वर मिश्र नाहीत. चंद्रशेखर, इतकेच काय लालू यादव, येचुरीदेखील नाहीत. नाहीतर टोले आणि टोमणे म्हणजे काय याचा प्रत्यय आलाच असता. राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळ्यांवर राज्य करणे सोपे असते,” अशा शब्दात शिवसेनेनं भाजपाला सुनावलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 7:40 am

Web Title: sanjay raut pm narendra modi rahul gandhi politics bmh 90
Next Stories
1 स्वदेशीची कास धरा!
2 शेतकऱ्यांची जमीन कोणी बळकावू शकत नाही!
3 युरोपमध्ये करोना लसीकरणाला वेग
Just Now!
X