पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्याचसंदर्भातील याचिकेवर न्यायालयाने आज सुनावणी केली. यामध्ये न्यायालयाने  मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. तसंच सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेली एफआयआर योग्य असल्याचं यावेळी सांगितलं आहे. याच निकालावरुन आता विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल नेटवर्किंगवरुन भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. तर काहीजणांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी केल्याचे पाहायला मिळत आहे.
याचसंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, “राजीनाम्याबद्दलच बोलायचं झालं तर थेट दिल्लीपर्यंत विचार करावा लागेल,” असं म्हटलं आहे. या प्रकरणासंदर्भात विचार करुन प्रतिक्रिया दिली पाहिजे असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> कोणाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते हे महाराष्ट्र सरकारने आता तरी सांगावे : भाजपा

महाराष्ट्रातील शासन आणि प्रशासन हे देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांपैकी एक असल्याचे सांगत सुशांत प्रकरणामध्ये राजकारण केलं जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची संपूर्ण प्रत हाती आल्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

“सीबीआय चौकशी करणं हे एखाद्या राज्याच्या अधिकारावर आक्रमण करण्यासारखं आहे मग तो तपास पश्चिम बंगालमधील असो, झारखंडमधील असो किंवा मध्य प्रदेशमधील असो. मुंबईमध्ये एखादी घटना घडली तर त्याचा तपास मुंबई पोलीस करणार. तुम्ही आमचा तपास पूर्ण होईपर्यंत थांबण्यास तयार नाही. तुम्ही सीबीआयकडे चौकशी देण्याची मागणी करत असला तरी आमची लढाई मात्र राज्याच्या अधिकारांसाठी आहे,” असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> सुशांत प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या निर्णयावर सुब्रमण्यम स्वामींची तीन शब्दात प्रतिक्रिया; तासाभरात १७ हजार शेअर्स

“सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. आम्ही ही सुनावणी दोन न्यायाधीशांच्या खंडपीठांपुढे करावी अशी मागणी केली होती. मात्र स्क्रीप्ट आधीपासूनच तयार असेल तर आता प्रयत्न करुन काय फायदा होणार आहे,” अशा शब्दांमध्ये राऊत यांनी या निकालाबद्दल नाराजी व्यक्त केली.