संसद टीव्ही या चॅनेलचं १५ सप्टेंबरला शुभारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबर रोजी संसद भवनात आयोजित कार्यक्रमात संसद टीव्हीचे औपचारिक उद्घाटन करतील. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती वेकंय्या नायडू, लोकसभा स्पीकर ओम बिरला उपस्थित राहणार आहेत. संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज दाखवणाऱ्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्हा दोन्ही वाहिन्यांचं सरकारनं विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही वाहिन्यांचं विलीनीकरण करून संसद टीव्ही अशी एकच वाहिनी असणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना, संसद टीव्हीची दोन चॅनेल असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जेणेकरून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज त्यांच्यावर सतत प्रसारित करता येईल. सेवा निवृत्त सनदी अधिकारी रवि कपूर यांची संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कपूर यांनी यापूर्वी विविध केंद्रीय मंत्रालयांमध्ये वेगवेगळ्या पदांवर सेवा बजावली आहे.

लोकसभेचं कामकाज दाखवण्यासाठी लोकसभा टीव्ही सुरू करण्यात आली होती. १९८९मध्ये ही वाहिनी सुरू करण्यात आली होती. काही काळानंतर राष्ट्रपतींचं अभिभाषण, लोकसभेतील प्रश्नोतरांचा तास, शून्यप्रहर यांचं थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आलं. त्याचप्रमाणे लोकसभा टीव्ही या वाहिनीच्या धर्तीवर राज्यसभेचं कामकाज दाखवण्यासाठी राज्यसभा टीव्ही सुरू करण्यात आली. २०११मध्ये ही स्वतंत्र वाहिनी सुरू झाली.