संस्कृत आयोगाची शिफारस; संस्कृत भाषा सक्तीची करण्याचे प्रस्तावित
प्राचीन भारतातील शास्त्रीय कामगिरीचे महत्त्व अधोरेखित करताना दुसऱ्या संस्कृत आयोगाने भाषेबद्दलचे स्वारस्य पुनरुज्जीवित करण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या असून त्यामध्ये वैज्ञानिक आणि पंडित यज्ञभस्म, पाऊस पडणे याबद्दल एकत्रित बसून काम करू शकतील अशी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा अंतर्भाव आहे.
पद्मभूषण सत्यव्रत शास्त्री यांच्या अध्यक्षतेखालील १३ सदस्यीय पथकाने शालेय विद्यार्थ्यांसाठी चार भाषांमधील सूत्र प्रस्तावित केले असून त्यामध्ये इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषा सक्तीची करण्याचे प्रस्तावित आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी यूपीए-२ सरकारने दुसरा संस्कृत आयोग स्थापन केला आणि त्यांनी आपला ४६० पानांचा अहवाल मानव संसाधन मंत्रालयास सादर केला. त्यामधील शिफारशींचा सरकार सध्या अभ्यास करीत आहे.
प्राचीन शास्त्रोक्त कामगिरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिणामकारक संपर्क यंत्रणेवर प्रकाशझोत टाकण्याच्या सूचना या अहवालात करण्यात आल्या असून त्याची प्रत ‘दी इंडियन एक्स्प्रेस’कडे उपलब्ध आहे. या धर्तीवर सर्व विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये संस्कृत भाषेचा सक्तीचा पेपर घेण्याचे आणि त्यासाठी संस्थांमध्ये संस्कृत शिकविणाऱ्या शिक्षकांची भरती करण्याचेही आयोगाने सुचविले आहे.
सध्या कृषी विद्यापीठे, वास्तुस्थापत्यशास्त्र आणि शहर नियोजन, गणित संस्था, आयआयटी आणि आयआयएम, विधी महाविद्यालये त्यांच्या विद्यार्थ्यांना केवळ पाश्चिमात्य ज्ञान उपलब्ध करून देत आहेत. मात्र या संस्थांमधील विद्यार्थ्यांना आपल्या पूर्वसुरींनी काय शोध लावले आहेत त्याची कल्पनाही नाही, असे अहवालात म्हटले आहे. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्र, शुक्रनीती, विदुरनीती आणि महाभारत, रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी रससारसमुच्च आदी प्राचीन शास्त्र शिकविण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल, त्यामुळे सरकारने याला प्राधान्यक्रम द्यावा, असेही म्हटले आहे.