लोकांची मने शुद्ध करणारी संस्कृत भाषा संपूर्ण जगाला पवित्र करू शकते. त्यामुळे तिचा जगभर प्रचार व्हायला हवा, अशी सूचना परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी १६ व्या जागतिक संस्कृत परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केली.
६० देशांमधील संस्कृत विद्वानांची पाच दिवसांची परिषद रविवारपासून येथे सुरू झाली. तिच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून केलेल्या भाषणात स्वराज यांनी संस्कृतच्या व्यापक प्रचारावर भर दिला. सहाशेहून अधिक संस्कृत तज्ज्ञांसमोर त्यांनी संपूर्ण संस्कृतमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी संस्कृतचे वर्णन ‘आधुनिक व जागतिक’ भाषा असे केले आणि तिच्या परंपरेची तुलना गंगा नदीशी केली जाऊ शकते असे सांगितले.
गंगा नदी ‘गोमुख’ या तिच्या उगमापासून जेथे समुद्राला मिळते त्या ‘गंगासागर’पर्यंत पवित्र राहते. गंगा तिच्या उपनद्यांनाही पवित्र करते. त्याचप्रमाणे संस्कृत भाषाही तिच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच गोष्टींना ती पवित्र करते. त्यामुळे संस्कृतचा सर्वत्र प्रचार करायला हवा, जेणेकरून ती लोकांची मने शुद्ध करेल आणि परिणामी संपूर्ण जगाला पवित्र करेल, असे स्वराज म्हणाल्या.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात संस्कृतसाठी सहसचिव पदाची जागा तयार करण्यात आली असल्याचे स्वराज यांनी यावेळी जाहीर केले. संस्कृत ही भाषेच्या ओळखीसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात, भाषांतर, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या इतर क्षेत्रांत संस्कृत महत्त्वाची भूमिका बजावू शकते, या शास्त्रज्ञांच्या मताचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. भारतातून या परिषदेत सहभागी झालेल्या २५० विद्वानांपैकी सुमारे ३० जण संघ परिवारातील ‘संस्कृत भारती’ या संस्थेशी संबंधित आहेत.
१९७२ साली सर्वप्रथम दिल्लीत आयोजित करण्यात आल्यानंतर जागतिक संस्कृत परिषद वेगवेगळ्या देशांमध्ये झालेली आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने (आयसीएआर) संस्कृतसाठी भरीव योगदान देणाऱ्या विद्वानाला २० हजार अमेरिकी डॉलर्सचा आंतरराष्ट्रीय संस्कृत पुरस्कार देण्याचे ठरवले असून, संस्कृत भाषा किंवा साहित्यात भारतामध्ये संशोधन करण्यासाठी दोन परदेशी विद्वानांना शिष्यवृत्तीही दिली जाईल, असे स्वराज यांनी जाहीर केले.