पाकिस्तानातील तुरुंगात हल्ल्यामुळे जखमी झालेल्या सरबजित (४९) या भारतीय कैद्याची प्रकृती रविवारी आणखी खालावली. तो जिवंत राहण्याची शक्यता अंधुक असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या पाकिस्तानी डॉक्टरांनी सांगितले. येथे आलेले सरबजितचे कुटुंबीय या घडामोडींमुळे व्याकूळ झाले असून, त्यांनी त्याला भारतात उपचारासाठी नेऊ देण्याची विनंती पाकिस्तान सरकारला केली आहे. मेंदूला जबरदस्त दुखापत झाल्याने सरबजित अत्यवस्थ आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या जवळ जाता आले नाही. खिडकीतून पाहण्यावरच त्यांना समाधान मानावे लागले. त्याच्या मज्जासंस्थेवर मारहाणीने विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानने राजनैतिक अधिकाऱ्यांना सरबजितची नियमित भेट घेण्याची परवानगी रविवारी रात्री दिली असल्याचे समजते.  
कोट लखपत तुरुंगातील कैद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरबजित सिंगला उपचारासाठी भारतात पाठवावे, अशी विनंती त्याच्या पत्नीने रविवारी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना केली.
सरबजितची पत्नी सुखप्रीत, त्यांच्या कन्या स्वपनदीप व पूनम, तसेच बहीण दलबीर कौर हे सर्व जण रविवारी दुपारी वाघा सीमा ओलांडून पाकिस्तानात दाखल झाले. सरबजितची पत्नी सुखप्रीत कौर यांनी सांगितले, ‘‘सरबजितला जिना रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचे आम्हाला समजले आहे. जर माझ्या पतीला उपचारासाठी भारतात पाठवले तर बरे होईल.’’
सरबजितची बहीण दलबीर कौर म्हणाल्या, ‘‘अतिशय दु:खद परिस्थितीत आम्ही पाकिस्तानला भेट देत आहोत. गंभीर जखमी असलेल्या बंधूला भेटायला येथे आलो असून, तो कोमात असल्याचे सांगण्यात आले आहे. कोटय़वधी भारतीयांच्या सदिच्छांसह आपण सुवर्णमंदिरातील प्रसाद भावाला देणार आहोत.’’ या वेळी अश्रू लपवणे दलबीर यांना कठीण जात होते. पाकिस्तान सरकारने आमच्यापैकी एकाला सरबजितजवळ राहण्यास परवानगी दिली आहे व आपण त्याच्याजवळ राहणार आहोत. सरबजितची कन्या पूनम हिने सांगितले, की आपण एकदाच वडिलांना तुरुंगात भेटलो आहोत. वडिलांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मोठा आनंद झाला व त्यांना आता रुग्णालयात ठेवण्यात आले आहे ही दु:खद घटना आहे. वडिलांच्या प्रकृतीसाठी आपण परमेश्वरापाशी प्रार्थना करत आहोत.
सरबजितला ठार मारण्याचा  हल्लेखोरांचा इरादा होता..
 ‘लाहोर येथे सरबजितने बॉम्बस्फोट घडविले, याचा आम्हाला राग होता, त्यामुळे त्याला ठार मारण्याचा कट आम्ही रचला होता,’ अशी कबुली सरबजित सिंगवर हल्ला केल्याच्या प्रकरणी प्रमुख आरोपीने दिली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक (तुरुंग) मलिक मुबाशिर यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे, की मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या अमेर अफताब व मुदस्सर या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार ते सरबजितचा द्वेष करीत होते, कारण १९९०मध्ये पाकिस्तानात लाहोर येथे झालेल्या बॉम्बस्फोटास सरबजित जबाबदार होता असे त्यांचा समज होता. त्यामुळे त्याच्याविषयी त्यांना राग होता.