कोलकाता पोलीस आयुक्तांनी शारदा चिटफंड घोटाळ्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचा आरोप  सीबीआयने केला असून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, सदर याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्याचे सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. पोलीस आयुक्तांनी पुरावे नष्ट करण्याचा दूरान्वयेही प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कोलकाता पोलीस आयुक्त राजीवकुमार चौकशीत सहकार्य करीत नसल्याचा आरोप सीबीआयने केला असून, त्यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती सीबीआयने याचिकेमध्ये केली आहे.  सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठासमोर राजीवकुमार यांच्यावर आरोप करणारी याचिका मांडली.

राजीवकुमार यांनी पुरावे नष्ट केल्याचा आरोप सीबीआयने केला, त्या बाबत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे की, कोलकाता पोलीस आयुक्तांनी पुरावे नष्ट करण्याचे दूरान्वयेही प्रयत्न केले असतील आणि त्याच्याशी संबंधित साक्षीदार समोर आले तर त्यांना पश्चात्ताप करावा लागेल, अशी कठोर कारवाई होईल. याबाबतचा सर्व दस्तावेज किंवा पुरावे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पश्चिम बंगाल पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारी कोलकातामध्ये राजकीय पक्षासमवेत धरणे धरून बसले असल्याने असामान्य स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.