शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची सीबीआयकडून शिलाँग येथे चौकशी सुरु आहे. राजीव कुमार आणि सीबीआय अधिकारी शिलाँग येथील मुख्यालयात दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार चौकशी करण्यासाठी शिलाँगची निवड करण्यात आली आहे.

सरस्वती पूजा आणि बोर्ड परिक्षांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्ताबाबत निर्णय घ्यायचे असल्याने आपल्याला फार वेळ शिलाँगमध्ये थांबता येणार नाही असे राजीव कुमार यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. सरस्वती पूजा उद्या तर बोर्डाच्या परिक्षा १२ फेब्रुवारीपासून आहेत.

राजीव कुमार यांच्यासोबत राज्यातील तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी शुक्रवारीच शिलाँग येथे पोहोचले. चिटफंड घोटाळा प्रकरणात राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी सीबीआयने दहाजणांचे पथक बनवले आहे. रविवारी सीबीआय अधिकारी चौकशीसाठी थेट राजीव कुमार यांच्या निवासस्थानी धडकल्यानंतर स्थानिक पोलीस आणि सीबीआयमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआयच्या या कारवाई विरोधात धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. अखेर हा सर्व वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार आज शिलाँग येथे चौकशी होणार आहे. शारदा चिटफंड घोटाळयाचे पुरावे नष्ट करण्यात राजीव कुमार यांची भूमिका असल्याचा सीबीआयचा आरोप आहे. याच प्रकरणात सीबीआयला त्यांची चौकशी करायची आहे.