शारदा चिट फंड घोटाळ्यात पश्चिम बंगालचे वाहतूक मंत्री मदन मित्रा यांना अटक करण्यात आल्याने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस अडचणीत आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआयची कारवाई घटनाबाह्य़ व बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
मित्रा यांना शारदा रिअल्टी प्रकरणी गुन्हेगारी कट, फसवणूक, निधीचा गैरवापर या आरोपाखाली अटक करण्यात आली, असे सीबीआयच्या प्रवक्तयाने सांगितले. त्यांना पाच तासांच्या जाबजबाबानंतर कोठडीत टाकण्यात आले आहे. सॉल्ट लेक सीजीओ संकुलात सीबीआयचे कार्यालय आहे तेथे त्यांचे जाबजबाब घेण्यात आले. सीबीआयने सुदीप्तो सेन व शारदा समूहाचे विधी सल्लागार नरेश बलोदिया यांनाही अटक केली आहे. गुन्हेगारी कट, फसवणूक व निधी दुसरीकडे वळवणे या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सीबीआयला सुदीप्तो सेन यांनी पाठवलेले पत्र बलोदिया यांनी तयार केले होते. सीबीआयने याआधी तृणूमूलचे खासदार कुणाल घोष व श्रीजय बोस यांना शारदा घोटाळाप्रकरणी अटक केली आहे.