नवी दिल्ली : मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक-शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सारथी’ या संस्थेकडून दिले जाणारे विद्यावेतन फेब्रुवारी महिन्यात अजूनही मिळालेले नाही. त्यामुळे दिल्लीत २२५ लाभार्थी विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. विद्यावेतनाअभावी दिल्लीत राहणे शक्य नसल्याने गावी परत जाण्याचा विचार काही विद्यार्थी करत आहेत. या अडचणींची तातडीने दखल घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

सारथी संस्थाअंतर्गत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन दिले जाते. दिल्लीत २२५ विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून त्यांना दरमहा १३ हजार रुपयांचे विद्यावेतन मिळते. जुलै ते नोव्हेंबर २०१९ हे पाच महिने वेळेवर महिन्याच्या १ तारखेला विद्यावेतन दिले गेले, मात्र डिसेंबर-जानेवारीतही विद्यावेतन विलंबाने मिळाले होते. विद्यावेतनातून घरभाडे, खानावळ, अभ्यासिका यांचा खर्च भागवला जातो. पण गेल्या तीन महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने या विद्यार्थ्यांना दिल्लीतील खर्च भागवणे अशक्य झाले आहे, असे भारतीय विद्यार्थी हक्क संस्थेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘सारथी’च्या उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या काही खासदारांना समस्येची माहिती दिली असून त्यांनी मागासवर्गीय मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष उमेश कोर्रम यांनी दिली. कोर्रम हेदेखील दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. पूर्वी ‘सारथी’ संस्थेचे काम सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत होते. ते आता मागासवर्गीय खात्याकडे देण्यात आले आहे. ही संस्था अधिकाऱ्यांच्या कामकाजावरूनही चर्चेत आहे.

‘सारथी’च्या स्वायत्ततेवरूनही वाद सुरू आहे. त्याचा फटका आम्हाला बसत आहे. आम्ही सगळेच बिगर क्रिमीलेअरमधील विद्यार्थी आहोत. आम्हाला विद्यावेतनाची तातडीने गरज आहे. त्याशिवाय आम्ही दिल्लीत राहू शकत नाही, असे लाभार्थी विद्यार्थी अविनाश लोंढे  यांचे म्हणणे आहे. दिल्लीतील खर्च बघता विद्यावेतनाअभावी इथे राहणे कठीण होऊ लागले आहे, असे राजेश गोणवटे यांनी सांगितले.