माझी हत्या झाली तर माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने हा देश आणखी अभंग आणि बळकट राहील, असे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हत्येआधीच्या मुलाखतीतच सांगितले होते. त्यामुळे १९ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन केंद्र सरकारतर्फे ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून पाळला जात असे केंद्रातील सत्तांतरानंतर ‘राष्ट्रीय एकता दिना’चा संदर्भ आणि दिवसही बदलला आहे! स्वातंत्र्यानंतर शेकडो संस्थाने देशात विलीन करून घेणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकता दिन’  म्हणून केंद्रातर्फे साजरा होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी इंदिराजींची हत्या झाली होती त्यामुळे ‘एकता दिवस’ बदलतानाच इंदिराजींचे विस्मरणही नव्या सरकारने साधले आहे.
इंदिराजी पंतप्रधानपदी असताना त्यांची हत्या झाली. अशा परिस्थितीत सरकार या हौतात्म्याकडे दुर्लक्ष करते, ही बाब दुर्दैवी असल्याचे सांगत तुम्ही ‘३१ ऑक्टोबर’ विसरलात काय, अशी विचारणा थरूर यांनी ट्विटरद्वारे सरकारला केली. काँग्रेसने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. महात्मा गांधी वगळता इंदिराजी अथवा अन्य नेत्यांचे स्मृतिदिन सरकारने साजरे करण्याऐवजी त्या त्या राजकीय पक्ष आणि संबंधित संस्थांवरच ते सोपवावेत, अशी सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दोन वर्षांपूर्वीच केली होती. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी व्यक्त केली.
केवळ महात्माजीच!
यापुढे केवळ महात्मा गांधी यांचीच जयंती व स्मृतिदिन साजरा करण्याचे सरकारने जाहीर केले असून अन्य दिवंगत नेत्यांच्या जयंत्या वा पुण्यतिथी संबंधित संस्था, पक्ष, विश्वस्त संस्था वा समर्थकांनी पाळाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याखेरीज, यापुढे सरकारी बंगल्यांचे स्मृतिस्थळात रूपांतर न करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.