जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्य़ात ‘गावाकडे चला’ (बॅक टू व्हिलेज) हा सरकारी कार्यक्रम सुरू असताना दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक सरपंच आणि फलोत्पादन विभागाचा एक अधिकारी असे दोन जण ठार झाले.

या घटनेमुळे दहशतवादग्रस्त परिसरामध्ये जनतेपर्यंत पोहोचण्याच्या सरकारच्या पुढाकाराला  धक्का बसल्याचे मानले जात आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सरपंच रफिक शाह आणि सरकारी अधिकारी मंझूर पारे आणि झहूर अहमद शेख हे तीन जण जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे शाह आणि शेख यांचे निधन झाले. पारे यांना श्रीनगरमधील रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या वेळी उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे संयुक्त संचालक बिलाल खुर्शिद यांना हल्ला होताच सुरक्षित स्थळी नेण्यात आले.

हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेगवेगळ्या गुन्ह्य़ांमध्ये या दहशतवाद्यांचा सहभाग होता. शादीमर्ग येथील वाहन तपासणी केंद्रावरील सुरक्षा दलाच्या जवानांवर सोमवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले असता त्यात इरफान अहमद शेख आणि इरफान अहमद राठेर हे दोघे हिज्बुलचे दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.