भारतातून फुटून निघालेले पाकिस्तानसारखे देश आता संकटात आहेत, असे सांगून रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी ‘अखंड भारत’ निर्माण होण्याची आवश्यकता पुन्हा बोलून दाखवली.

‘अखंड भारत’ हा हिंदू धर्माच्या आधारावर शक्य आहे, मात्र बळाच्या आधारावर नाही, असे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी सांगितले. ‘विश्वकल्याणासाठी वैभवशाली अखंड भारत करण्याची गरज आहे. त्यामुळेच देशासाठी देशभक्ती जागृत करणे आवश्यक आहे,’ असे भागवत म्हणाले. सध्याच्या भारतापेक्षा, पूर्वीच्या भारतापासून वेगळे झालेल्या भागांना (देशांना) त्यांच्या ‘क्लेशांतून’ बाहेर पडण्यासाठी एकत्रीकरणाची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.

‘अखंड भारताची’ संकल्पना शक्य आहे, याचा भागवत यांनी पुनरुच्चार केला. १९४७ साली देशाचे विभाजन होण्यापूर्वी, पाकिस्तानची निर्मिती होईल का, याबाबत काही लोकांनी गंभीर शंका व्यक्त केली होती, मात्र तसे घडले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानच्या निर्मितीची शक्यता हे ‘मूर्खाचे स्वप्न’ असल्याचे म्हटले होते. त्या वेळी जे अशक्य वाटले ते घडले. त्यामुळे सध्या जो ‘अखंड भारत’ अशक्य वाटतो, तो होईल याची शक्यता नाकारता येत नाही, असेही भागवत यांनी सांगितले.