शांतता प्रक्रियेसाठी भारताला डावलून इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू
अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात चर्चा करण्यासाठी कोणतीही पूर्वअट घालण्यात येऊ नये, असे पाकिस्तानने सोमवारी स्पष्ट केले. शांतता प्रक्रिया सुरू करण्यासाठी अफगाणिस्तान, पाकिस्तान, अमेरिका आणि चीन यांच्यातील महत्त्वाची बैठक येथे सुरू झाली.
या बैठकीत पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझिझ यांच्यासह अफगाणिस्तानचे उपपरराष्ट्रमंत्री हेकमत करझाई, पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी, अमेरिकेचे अफगाणिस्तान, पाकिस्तानातील विशेष प्रतिनिधी रिचर्ड ओल्सन, अमेरिकेचे पाकिस्तानातील वरिष्ठ संरक्षण प्रतिनिधी जनरल अॅन्थोनी रॉक आणि चीनचे अफगाणिस्तानातील विशेष दूत डेंग शिंजून उपस्थित आहेत. कोणतीही पूर्वअट घातल्यास शांतता प्रक्रियेच्या मार्गात अडथळे येतील आणि त्यामुळे तालिबानला चर्चेला समोर आणण्यातही अडचणी येतील, असे सरताज अझिझ यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले.
हिंसाचार सोडून तालिबानला चर्चेच्या टेबलावर आणणे, हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे चर्चेसाठी कोणतीही पूर्वअट घालण्यात येऊ नये हे महत्त्वाचे आहे, असेही अझिझ म्हणाले. तालिबानविरुद्ध लष्करी कारवाई केल्यास चर्चेच्या मार्गात अडथळे येतील आणि सर्व गटांशी चर्चा होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.
अफगाणिस्तानात २०१४च्या अखेरीस परदेशी सैन्य मागे घेतल्यानंतर हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर शांतता प्रक्रियेचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांत तालिबानने दक्षिणेकडील हेलमंड प्रांतावर संपूर्ण कब्जा केला असून, उत्तरेकडील कुंडुझ शहरावर काही अंशी कब्जा केला आहे. तालिबानने आत्मघाती हल्ले सुरूच ठेवल्याने अफगाण सैन्याला तालिबानचा सामना करणे अवघड झाले आहे.

सहभागाबाबत तालिबानमध्ये मतभेद
तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहम्मद ओमर ठार झाल्याची घोषणा तालिबानने केल्यानंतर शांतता प्रक्रियेला खीळ बसली होती. नव्याने शांतता चर्चा सुरू झाल्याने त्यात सहभागी व्हावे की नाही, याबाबत तालिबानमध्ये मतभेद आहेत. तालिबानच्या काही गटांचा चर्चेच्या वाटाघाटीस विरोध असून काहींना चर्चेत सहभागी व्हावे, असे वाटत असल्याचे तालिबानच्या एका वरिष्ठ नेत्याने गेल्या आठवडय़ात सांगितले होते.