मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची सुटका करण्याच्या न्यायालयाच्या आदेशावर भारताने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचे वर्णन पाकिस्तानने ‘तर्कशून्य’ असे केले असून, या मुद्दय़ाचा प्रस्तावित द्विपक्षीय चर्चेवर काही परिणाम होणार नाही, अशी आशा व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी पत्रकारांशी बोलताना हे भाष्य केले. लख्वी तुरुंगात राहावा याकरिता पाकिस्तान पुरेसे प्रयत्न करत नसल्याचा भारताचा आरोपही त्यांनी नाकारला.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने लख्वीच्या स्थानबद्धतेबाबत दिलेल्या आदेशावरील भारताची प्रतिक्रिया ‘तर्कशून्य’ असल्याचे अझीझ म्हणाल्याचे वृत्त ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने दिले आहे. पाकिस्तानची न्याययंत्रणा मुक्त असून स्वतंत्रपणे काम करत असल्याचे ते म्हणाले. न्यायालयाच्या आदेशाचा दोन्ही देशांमधील शांततेसाठीच्या चर्चेवर परिणाम होणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भारताकडून चर्चेसाठी बोलावण्याची पाकिस्तान वाट पाहात असून, त्यानंतर परस्परसंवादाची प्रक्रिया औपचारिकरीत्या सुरू करण्यासाठी आमचे परराष्ट्र सचिव भारतात जाऊ शकतील, असे अझीझ यांनी सांगितले. पाकिस्तान व भारतादरम्यान पाण्याबद्दल असलेल्या वादासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील पाणीतंटा सोडवण्यासाठी सिंधू पाणी करारांतर्गत यंत्रणा आहे.