पंजाबच्या उधमपूरमध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर करण्यात आलेला हल्ला त्याचप्रमाणे पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येणार शस्त्रसंधीचे उल्लंघन यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असतानाच दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पातळीवरील चर्चा दिल्लीत २३ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
पाकिस्तानकडून या बैठकीचा होकार आला असून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझिझ भारत दौऱ्यावर येणार आहेत. या बैठकीत प्रथमच दहशतवादाशी संबंधित सर्व विषयांवर चर्चा होणार असून दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी उचलण्यात आलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
सरताज अझिझ यांनी २३ ऑगस्ट रोजी भारत दौऱ्यावर जात असल्याचे इस्लामाबादमध्ये वार्ताहरांना सांगितले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची उफा येथे भेट झाल्यानंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात काश्मीरचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर नाराज झाले असून त्यांनीच लष्कराचा या दौऱ्याला विरोध आहे, अशी चर्चा सुरू होती.
‘उफा’ येथे प्रसृत करण्यात आलेल्या निवेदनानुसार, भारत आणि पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा दिल्लीत घेण्यास मान्यता दिली आहे. या वेळी दहशतवादाशी संबंधित सर्व प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात चर्चा झाल्यानंतर भारताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आणि अझिझ यांच्यात दिल्लीत २३-२४ ऑगस्ट रोजी चर्चा करण्याचे प्रस्तावित केले.
नवाझ शरीफ यांचा चर्चेवर विश्वास आहे, परराष्ट्र सचिव पातळीवर गेल्या वर्षी २५ ऑगस्ट रोजी होणारी चर्चा भारतानेच खंडित केली, अशी भाषा सरताज अझिझ यांनी केली आहे. त्यानंतर भारताच्या विनंतीवरून दोन्ही पंतप्रधान रशियातील उफा येथे भेटले आणि दिल्लीतील भेट ठरविण्यात आली, असे अझिझ म्हणाले.
सदर बैठक सर्व प्रश्नांवरील व्यापक बैठक नाही, मात्र त्यामधून दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत होणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अधिक व्यापक चर्चा होईल, अशी आशा अझिझ यांनी व्यक्त केली. शरीफ यांच्या मंजुरीनंतर दोवल आणि अझिझ यांच्यातील बैठकीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.