|| महेश सरलष्कर

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादामुळे फरपट झालेल्या चिमुकल्यांना मायेची ऊब देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम गेल्या २२ वर्षांपासून ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ करत आहे. अधिक कदम या मराठी तरुणाच्या या संस्थेने पाच बालिकाश्रमांद्वारे सुमारे २५० मुलींना आसरा दिला. शांततेची आस असणारी नवी पिढी घडविण्यासाठी अनेक प्रकल्प अधिकला राबवायचे असून, त्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळ हवे आहे.

‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ या संस्थेची नोंदणी पुण्यात नोंदणी झाली आहे. या संस्थेचे जम्मू शहरात तसेच काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग, श्रीनगर, बिरवा आणि कुपवाडा येथे बालिकाश्रम आहेत. ही संस्था मुलींच्या निवासाबरोबरच त्यांच्या शिक्षणाचाही पूर्ण खर्च उचलते. प्रत्येक मुलीमागे दरवर्षी किमान साठ हजार रुपये खर्च येतो. अठरा वर्षांपर्यंत मुलींना बालिकाश्रमात राहता येते. काही मुलींना पदवी शिक्षणाचीही संधी मिळाली आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, हैदराबाद, बंगळूरु, कन्याकुमारी या शहरांमध्ये या मुली शिकत असून, त्यांच्या शिक्षण आणि निवासाचा खर्चही संस्था करते. बालिकाश्रमांसाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची वास्तू नाही. सर्व बालिकाश्रम भाडय़ाच्या जागेत चालतात. जम्मूमध्ये संस्थेने जागा विकत घेतली असून तिथे मोठी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या बालिकाश्रमात किमान अडीचशे मुली राहू शकतात. ही वास्तू उभारण्याचा खर्च पाच कोटी रुपये असून, आत्तापर्यंत संस्थेला दीड कोटींचा निधी जमवता आला आहे. संस्थेच्या कामाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी ही वास्तू उभी राहणे महत्त्वाचे असून त्यासाठी मदतीचे आवाहन संस्थेने केले आले आहे.

‘बॉर्डरलेस’ संस्था सुरक्षा दलासोबतही काम करते. जम्मू तसेच काश्मीर खोऱ्यात या संस्थेने ‘तातडीची वैद्यकीय सेवा’ पुरवणाऱ्या दहा अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘बीएसएफ’ने आणखी किमान दहा अ‍ॅम्ब्युलन्सची मागणी केली आहे. एका अ‍ॅम्ब्युलन्सची किंमत सुमारे चाळीस लाख रुपये आहे. ‘बीएसएफ’ची मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संस्थेचा मनोदय आहे. या कामासाठीही निधीची आवश्यकता आहे.