तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या सहकारी व्ही. के. शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. शशिकला यांची सर्वसंमतीने सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. गेली तीन दशके हे पद जयललिता यांच्याकडे होते. अण्णा द्रमुक पक्षाच्या बैठकीत शशिकला यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अण्णा द्रमुकच्या महत्त्वाच्या बैठकीत शशिकला यांची एकमताने पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला शशिकला उपस्थित नव्हत्या. मात्र त्यांची एकमताने पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. अण्णाद्रमुक पक्षातील पदांच्या रचनेनुसार सरचिटणीसपदी असलेली व्यक्ती पक्षाची प्रमुख असते. त्यामुळे आता शशिकला यांच्याकडे अण्णा द्रमुकची धुरा असणार आहे.

जयललिता यांनी दाखवलेला मार्ग स्मरणात ठेवून शशिकला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करण्याची शपथ या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांनी घेतली. लोकसभेचे उपसभापती एम. थंबीदुराई, ज्येष्ठ नेते पनरुती एस. रामचंद्रन, राज्याचे मंत्री, पक्षाचे आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित होते.

या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी अण्णा द्रमुक पक्षाचे जिल्हा सचिव चेन्नईत दाखल झाले होते. यावेळी सर्व जिल्हा सचिव, पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख यांनी शशिकला यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शशिकला यांच्यासमोर कोणीच स्पर्धक नसल्याने एकमताने त्यांची एकमताने सरचिटणीसपदासाठी निवड झाली. शशिकला यांना आव्हान देऊ शकणारा एकही नेता पक्षात नसल्याने त्यांना पक्षांतर्गत कोणताही धोका नसेल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.

५ डिेसेंबरला जयललिता यांचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह अनेक नेत्यांनी शशिकला यांचे नाव सरचिटणीसपदासाठी पुढे केले होते. शशिकला यांनीच पक्षाची धुरा खांद्यावर घ्यावी, अशी पक्षातील अनेकांची भावना होती. त्यानुसार जयललिता यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या शशिकला यांची पक्षाच्या सरचिटणीसपटी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.