तामिळनाडूतील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. अण्णा द्रमूकचे नेते टीटीव्ही दिनकरन यांनी जयललिता रूग्णालयात दाखल असतानाचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे.  पण हा व्हिडिओ सार्वजनिक करण्यास आपल्याला परवानगी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना दिनकरन म्हणाले, शशिकला यांच्याकडे रूग्णालयात दाखल असलेल्या जयललिता यांचा व्हिडिओ आहे. यामध्ये जयललिता यांनी गाउन घातला आहे. हा व्हिडिओ मी सार्वजनिक करू शकत नाही. चौकशी समितीला मी हा व्हिडिओ देणार आहे.

काही दिवसांपूर्वीच शशिकला यांच्या निकटवर्तीय खासदार व्ही.वसंती यांनी मुख्यमंत्री इ.पलानीसामी यांना पाठिंबा देण्याची घोषणा करत दिनकरन यांना धक्का दिला होता. जयललिता यांच्या मृत्यूनंतर वसंती या त्या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांनीच शशिकला यांना मुख्यमंत्री करावे, अशी जाहीर मागणी केली होती. त्यांनी दिनकरन गट हा द्रमूकबरोबर जात असल्याचे सांगत आपली भूमिका बदलली होती.

तर दुसरीकडे इ. पलानीसामी आणि ओ पन्नीरसेल्वम गटाच्या एकत्रिकरणानंतरही अजूनही तक्रारी सुरू असल्याचे सांगण्यात येते. पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांच्या तैनातीवरून दोन्ही गटात सध्या वाद असल्याचे बोलले जाते.