छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी उदयनराजेंना भाजपचे सदस्यत्व बहाल केले.

नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वधर्मसमभावाच्या विचारांवर चालले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाहीचा विचार भाजप पुढे नेत आहे, असे मत उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर व्यक्त केले.

उदयनराजे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन शुक्रवारी रात्री चार्टर्ड विमानाने मुंबईहून दिल्लीला आले. रात्री साडेअकराच्या सुमारास उदयनराजेंचा लवाजमा दिल्लीत दाखल झाला. त्यानंतर उदयनराजेंनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन खासदारपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे निवडून आले होते. १७ व्या लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर साडेतीन महिन्यांनी उदयनराजेंनी खासदारपद सोडले. बिर्ला यांनी मध्यरात्री तातडीने त्यांचा राजीनामा स्वीकारला. उदयनराजे यांनी शनिवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आणि भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची अट उदयनराजेंनी घातली होती. परंतु त्यांच्या पक्षप्रवेशाला केवळ शहाच उपस्थित होते. प्रवेश समारंभाला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.

दरम्यान, उदयनराजे यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला असल्याने आता विधानसभेबरोबर लोकसभेचीही पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुन्हा भाजपचेच सरकार – शहा :  महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उत्तम काम केले आहे. भाजपला लोकसभेपेक्षाही अधिक यश आगामी विधानसभा निवडणुकीत मिळेल आणि तीन चतुर्थाश बहुमत मिळवून राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल. त्यासाठी उदयनराजे यांचे सहकार्य मिळेल. महाराष्ट्रातील मतदार २०१४ पासून मोदींना साथ देत आहेत. विधानसभेतही त्याची पुनरावृत्ती होईल, असे अमित शहा म्हणाले.

मोदींच्या विचारांशी सहमत-उदयनराजे : शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने राज्य केले. मोदी-शहादेखील लोकशाही बळकट करत आहेत. मोदी जनमानसाशी जोडले गेले आहेत. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन लोक एकत्र येत आहेत. काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करून त्यांनी देशाला एकसंध आणि मजबूत बनवले आहे. मोदींच्या विचारांशी आपण सहमत आहोत. आपल्याला समाजासाठी अधिकाधिक काम करायचे आहे, असे उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे हे राजे आहेत; पण ते लोकांमध्ये राहतात. लोकशाहीवर विश्वास ठेवून काम करतात. ते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या भाजपप्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पक्षप्रवेश सोहळ्यापासून मोदी दूर : उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाजपप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहतील, अशी चर्चा होती. उदयनराजे यांनी शुक्रवारी भाजप प्रवेशाबाबत केलेल्या ट्विटमध्येही मोदी यांचे छायाचित्र प्रसारित केले होते. मात्र शनिवारी सकाळी उदयनराजेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला मोदी अनुपस्थित होते. शिष्टाचाराच्या संकेतांमुळे मोदी पक्षप्रवेश सोहळ्यापासून दूर राहिल्याचे सांगण्यात आले.