डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद सध्या शांत दिसत असला तरी चीन या भागात गुप्तपणे आपल्या योजना राबवित असल्याची बाब उघड झाली आहे. चीनने गेल्या दोन महिन्यांत डोकलाममध्ये नवे रस्ते बनवले आहेत. सीमेपासून जवळच्या भागातील सॅटेलाईट छायाचित्रांवरून ही माहिती मिळतेय की ‘चीनी रोड वर्कर्स’ने या वादग्रस्त भागात सध्याच्या रस्त्यांचा विस्तार केला आहे. आश्चर्याची बाब ही आहे की, काही महिन्यांपूर्वी ७० दिवस भारत आणि चीनी सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या ठिकाणाहून हा रस्त्यांचा भाग जवळच आहे.

सॅटेलाईट छायाचित्रांवरुन हे स्पष्ट होते की, चीनने डोकलामच्या वादग्रस्त भागात नवे रस्ते बनवले आहेत. या मार्गांवर आलिकडील रस्त्यांचा विस्तार एक किमीपर्यंत झाला आहे. हा रस्ता वादग्रस्त जागेपासून साडेचार किमी अंतरावर आहे. तर सीमेपासून दुसऱ्या रस्त्यांचा झालेला विस्तार वादग्रस्त भूमीपासून ७.३ किमी अंतरावर आहे. उत्तरेकडे हा रस्ता १.२ किमी अंतरावर पसरला आहे.

गेल्या १३ महिन्यांपासून या भागात जुन्या सॅटेलाईट छायाचित्रांच्या तुलनेत हे स्पष्ट होते की, नव्या भागांची निर्मिती १९ फेब्रुवारीनंतर झाली आहे. मात्र, यातील दोन रस्त्यांच्या विस्ताराचे काम हे १७ ऑक्टोबर ते ८ डिसेंबर या काळात करण्यात आले आहे.

दरम्यान, जूनच्या मध्यावर भारतीय सैनिकांनी ‘चिकन्स नेक’ भागापासून जवळ चीनच्या रस्ते बांधणीचे काम थांबवण्यासाठी पाऊल उचलले होते. भारताच्या भूमीपासून जवळचे हे बांधकाम सुरु होते. हा भाग भारताच्या ईशान्येकडील राज्यांना जोडतो. सुमारे दोन महिने हा संघर्ष सुरु राहिल्यानंतर दोन्हीकडील सैन्याने आपली पावले सुमारे १५० मीटर मागे घेतली होती.

चीन आणि भारताचा हा संघर्ष या दशकातील सर्वात वाईट संघर्ष म्हणून नोंदवला गेला. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने या भागातून माघार घेतली होती. दरम्यान, एका ताज्या अहवालानुसार, चीनकडून डोकलाम भागात १००० पेक्षा अधिक सैनिक तैनात केले जाण्याची शक्यता आहे. थंडी संपेपर्यंत  चीनी सैनिक या क्षेत्रात पाय रोवून असणार आहेत. या भागात भारतीय लष्कर पूर्वीपासूनच संपूर्ण तयारीनीशी तैनात आहे.