समाजमाध्यमांवर वारंवार प्रगटण्याची सवय भिनलेल्या आपल्या देशात सध्या नेता आणि विचारवंतांची फळी बेताल विधानांमधून लक्ष वेधून घेण्याचे किंवा अनवधानाचे टोक गाठण्याचे कार्य साधत आहेत. गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी, अहमदाबाद आयआयएमचे प्राध्यापक सतीश देवधर आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी चोवीस तासांमध्ये तोडलेल्या शाब्दिक ताऱ्यांमुळे रविवार हा वाचाळवेडा दिवस ठरला. रात्री उशिरापर्यंत या वाचाळांनी मांडलेल्या भूमिकेवर चौफेर टीका सुरू होती.

कौतुकाची अतिशयोक्ती..

श्रीराम क्षत्रिय तर भगवान कृष्ण ओबीसी होते, अशा शब्दांत त्यांना जातीच्या कक्षेत आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याची मुक्ताफळे गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी उधळली. शनिवारी गांधीनगर येथे ब्राह्मण व्यापार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्रिवेदी म्हणाले, ब्राह्मण समाज कधीही सत्तेचा भुकेला नव्हता, उलट त्यांनी कित्येक राजांना त्यांच्या यशामध्ये योगदान दिले आहे. चंद्रगुप्त मौर्य, श्रीराम आणि भगवान कृष्ण यांच्या यशातही ब्राह्मणांचेच योगदान होते. ब्राह्मणांनीच देवांना बनवले आहे. श्रीराम हे क्षत्रिय होते मात्र, त्यांना देव बनवण्यामागे ब्राह्मण ऋषी, मुनींचे योगदान होते. तसेच कृष्ण ओबीसी होते, त्यांना देव बनवण्यामागे ब्राह्मण सांदिपनी ऋषींचे योगदान होते. ब्राह्मणांनी संस्कृती भाषेचे रक्षण केले असून मत्सकन्येचे पुत्र भगवान व्यासांना देखील ब्राह्मणांनीच देव बनवले.

मुख्यमंत्र्यांचा रोजगारसल्ला..

सध्या आपल्या विविधांगी बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी आपल्या राज्यातील  सुशिक्षित तरुणाईला अर्थाजनाचा नवा मार्ग सुचविला आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी सरकारी अधिकाऱ्यांचे उंबरे झिजविण्यापेक्षा पानाच्या टपऱ्या टाका, असा सल्ला  विप्लव देव यांनी दिला. सरकारी नोकरी मिळेल म्हणून विविध अधिकाऱ्यांच्या घरी कित्येक वर्षे रोजगार मागण्याऐवजी पान टपरी टाकणे केव्हाही इष्टच असे त्यांनी जाहीर कार्यक्रमात म्हटले. आपल्या बँक खात्यामध्ये पाच लाख रुपयांची रक्कम असणे, हे आजचे वास्तव असल्याचे देव यांनी स्पष्ट केले. पानाच्या टपरीसोबत गाय पाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला. गेल्या दहा वर्षांत गायी बाळगून आणि त्यांचे दूध विकून तरूणांना आपल्या बँक खात्यामध्ये दहा लाख रूपये बचत करून ठेवता आले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

प्राध्यापकाचा अपसमजप्रसार..

ग्रीक तत्त्ववेत्ते प्लेटो व अ‍ॅरिस्टॉटल यांच्या खूप आधीपासून भारतातील वेदांमध्ये आर्थिक विचार मांडलेले होते त्यामुळे आर्थिक विचारांची सुरुवात प्लेटो व अ‍ॅरिस्टॉटल यांच्यापासून झालेली नाही, तर त्याआधीच भारतात  झालेली होती असे मत अहमदाबाद आयआयएमचे प्राध्यापक सतीश देवधर यांनी त्यांच्या संशोधन निबंधात मांडले आहे. देवधर यांनी म्हटले आहे की, बीसीईच्या (बिफोर कॉमन एरा)चौथ्या शतकात ग्रीक लिखाणात आधुनिक आर्थिक विचार सापडतो त्यातूनच १८ वे शतक सीईमध्ये (कॉमन एरा) युरोपमध्ये प्रगत आर्थिक विचार आला पण त्याआधीच भारतीयांनी आर्थिक विचार वेदांमधून मांडला होता. प्राचीन भारतीय लेखनाचा अभ्यास करून देवधर यांनी आर्थिक विचार वेद व इतर जुन्या ग्रंथात होता असे सांगत त्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त केली. ग्रीसमध्ये मूळ आर्थिक विचार मांडला गेला त्याच्या खूप आधी तो मांडण्यात आला होता. चौथे शतक बीसीईमध्ये कौटिल्याने अर्थशास्त्र लिहिले, पण त्याकडे दुर्लक्ष झाले.