जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मलिक यांचा सवाल

जम्मू काश्मीरमध्ये जीवनावश्यक वस्तू व औषधांची कमतरता असल्याच्या वृत्ताचा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी इन्कार केला. फोन व मोबाइल सेवेवरील र्निबधांमुळे अनेक लोकांचे जीव वाचण्यास मदत झाली. जर त्यामुळे जीव वाचणार असतील तर या सेवा काही काळ बंद ठेवण्यात काहीच अडचण  नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

‘काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतरच्या काळातील दहा दिवसात हिंसाचारामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. जर फोन व मोबाइल सेवा बंद ठेवल्याने लोकांचे जीव वाचणार असतील तर ती काही काळ बंद ठेवण्यात काहीच गैर नाही’,  असे त्यांनी र्निबध किती दिवस चालणार, या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले आहे.

‘काश्मीरमध्ये आतापर्यंत जेवढे पेच निर्माण झाले त्यात पहिल्या आठवडय़ातच किमान पन्नास बळी जात असत. आमचा उद्देश हा प्राणहानी रोखणे हा आहे. दहा दिवस टेलिफोन बंद आहेत हे खरे आहे, पण आम्ही ते पूर्ववत करू. औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही. आम्ही ईदच्या दिवशी लोकांना मांस, भाज्या, अंडी, लोकांना घरी नेऊन दिली होती,’असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मलिक हे दिल्लीत आले असता त्यांना पत्रकारांनी काश्मीरमधील परिस्थितीवर प्रश्न विचारले. जेटली यांच्याबाबत त्यांनी सांगितले, की ‘त्यांच्याच आग्रहावरून आपण गेल्या वर्षी राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारली होती. तुमची ही जबाबदारी ऐतिहासिक राहील असे त्यांनी म्हटले होते. तसेच, त्यांचे सासू सासरे जम्मू काश्मीरचे आहेत, हे सांगायलाही ते विसरले नव्हते.’