रियाध : पुरुष पालकांच्या परवानगीशिवाय परदेश प्रवासाला जाण्याची मुभा सौदी अरेबियातील महिलांना देण्यात आली आहे. महिलांना परदेश प्रवासासाठी पुरुषांची परवानगी आवश्यक असल्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर सौदी अरेबियावर ताशेरे ओढण्यात आले होते.

सौदी अरेबियात सर्वच महिलांना कायदेशीर पातळीवर अल्पवयीन ठरवण्यात आले असून त्यांच्या पुरुष नातेवाईकांना मोठे अधिकार देण्यात आले आहेत. सौदी अरेबियात मोटार चालवण्यास महिलांना असलेली बंदी गेल्या वर्षी उठवण्यात आली होती. या सुधारणा करूनही महिलांवर अनेक निर्बंध अजूनही आहेत. त्यात परदेश प्रवासासाठी पुरुषांची परवानगी हा एक नियम होता तो आता मोडीत काढला आहे. उम्मा अल कुरा या राजपत्रात म्हटले आहे की, अर्ज करणाऱ्या कुणाही सौदी नागरिकाला पासपोर्ट जारी करण्यात यावा.

ओकाझ या सरकारी वृत्तपत्राने म्हटले आहे की, २१ वर्षांवरील महिला व मुलींना पालक पुरुषांच्या परवानगीशिवाय पासपोर्ट मिळणार आहे. विवाह, परदेश प्रवास, पासपोर्ट, नूतनीकरण या सगळ्या बाबींसाठी तेथे महिलांना पुरुषांची परवानगी घ्यावी लागते. या निर्णयाने महिलांना मोठी स्वायत्तता मिळाली असून त्या आता मुक्त विहार करू शकतील असे मत अरब गल्फ स्टेट्स इन्स्टिटय़ूट या अमेरिकी संस्थेतील क्रिस्तीन दिवाण यांनी व्यक्त केले. सौदी अरेबियातील महिला कार्यकर्ती लुजेन अल हथलौल ही तुरुंगात असून तिने तिसावा वाढदिवस तेथेच साजरा केला.