इस्लामाबाद : भारत व पाकिस्तान यांनी काश्मीर प्रश्न व इतर प्रलंबित प्रश्नांवर एकमेकांशी संवाद साधावा, असे आवाहन सौदी अरेबियाने केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले असून ते पाकिस्तान व सौदी अरेबिया यांच्या दरम्यानच्या मतैक्याबाबत आहे.

सौदी अरेबियाचे राजे महंमद बिन सलमान यांच्याशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उच्चस्तरीय चर्चा केली असून खान हे ७ ते ९ मे दरम्यान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरसह इतर मुद्दय़ांवर संवाद साधावा असे आवाहन केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये स्थिरता नांदावी अशी अपेक्षा दोन्ही देशांनी व्यक्त केली.

राजे सलमान यांनी भारत व पाकिस्तान यांच्यात अलीकडेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार न करण्याबाबत केलेल्या शस्त्रसंधीचे स्वागत केले आहे. २००३ मध्ये ही शस्त्रसंधी पहिल्यांदा करण्यात आली आणि नंतर त्याचे वारंवार उल्लंघन झाले होते. भारत व पाकिस्तान यांच्या लष्करांमध्ये २५ फेब्रुवारी रोजी शस्त्रसंधीचे पालन करण्यावर मतैक्य झाले होते. खान यांनी सौदी अरेबियातील भेटीत द्विपक्षीय प्रश्न, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली. अमली पदार्थांच्या चोरटय़ा व्यापाराला निर्बंध घालण्याचा करार या वेळी करण्यात आला. पाकिस्तानातील ऊर्जा प्रकल्पांना निधी देण्याचे सौदी अरेबियाने मान्य केले आहे. कैद्यांच्या हस्तांतराचाही करार या वेळी करण्यात आला.