सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान भारत दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानचा दौरा करून ते भारतात आले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यामुळे सौदीच्या राजपुत्रांचा दौरा कुटनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. मात्र, ज्या उत्साहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्लीत विमानतळावर जात त्यांची गळाभेट करत स्वागत केले. त्यावर आता मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारतात येण्यापूर्वी सौदीचे राजपुत्र पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला २० अब्ज डॉलरची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यानही मोठ्या गुंतवणुकीची आणि करारांची अपेक्षा केली जात आहे. भारत याप्रसंगाचा वापर पाकिस्तानला दहशतवादप्रकरणी कठोर संदेश देण्यासाठी करू इच्छितो.

दरम्यान, पाकिस्तानला २० अब्ज डॉलरची मदत करणाऱ्या सौदी अरेबियाच्या राजपुत्राचे पंतप्रधानांनी विमानतळावर जाऊन केलेले स्वागत काँग्रेसला रूचलेले नाही. आपल्या वर्तणुकीने मोदींनी देश, शहीद आणि प्रत्येक सैनिकांप्रती त्यांचा असलेला विचार दाखवून दिला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राष्ट्रीय हिताच्यावर असलेली ‘मोदीजींची हग डिप्लोम्सी’ असल्याचा टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधानांनी अशा लोकांचे प्रोटोकॉल तोडून जोरदार स्वागत केले आहे. ज्यांनी दहशतवादविरोधात पाकिस्तानच्या तथाकथित प्रयत्नांचे कौतुक करत २० अब्ज डॉलर देण्याचे जाहीर केले आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही याप्रश्नी सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी मागील वर्षी भारत दौऱ्यावर आलेले कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रडोंचा उल्लेख केला असून खलिस्तानच्या मुद्यावर ट्रुडोंचे समर्थन असल्याचे कारण सांगत मोदींनी त्यांना महत्व दिले नव्हते. त्यावेळी सर्वांनी त्यांना साथ दिली होती.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची प्रशंसा करणारे आणि त्यासाठी २० अब्ज डॉलरची घोषणा करणाऱ्या सौदी अरेबियाच्या राजपुत्राचे पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने प्रोटोकॉल तोडून स्वागत केले, ते योग्य होते काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.