सौदी अरेबियाने इराणशी असलेले राजनतिक संबंध दूतावासावरील हल्ल्यानंतर तोडले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री अब्देल अल जुबेर यांनी दिली. सौदी अरेबियाने शिया धर्मगुरूसह ४८ जणांना मृत्युदंड दिल्यानंतर इराणमध्ये सौदी अरेबियाच्या दूतावासावर संतप्त जमावाने हल्ला केला होता.
सौदी अरेबियात असलेल्या इराणच्या राजनतिक अधिकाऱ्यांनी ४८ तासांत देश सोडून जावे, असा आदेशही देण्यात आला आहे. जुबेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की सौदी अरेबिया इराणशी संबंध तोडत असून इराणच्या सर्व राजनतिक अधिकाऱ्यांनी देशातून निघून जावे. शनिवारी तेहरान येथे सौदी दूतावासावर हल्ला करण्यात आला होता तर माशाद या शहरात वाणिज्य दूतावासावरही हल्ला झाला होता. सौदी अरेबियाने शेख निम्र अल निम्र या धर्मगुरूचा शिरच्छेद केला होता. त्यानंतर इराणमध्ये त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शनिवारी सौदी अरेबियाने ४७ जणांना मृत्युदंड दिला त्यात या धर्मगुरूचा शिरच्छेद करण्यात आला होता. २०११ मध्ये पूर्व सौदी अरेबियात सरकारविरोधी निदर्शने केल्याचा आरोप त्याच्यावर होता. मृत्युदंड दिलेल्या शिया व सुन्नी अशा दोन्ही कैद्यांचा समावेश होता.