२१ व्या शतकामध्ये पदार्पण केल्यानंतर काळ झपाट्याने पुढे सरकू लागला आणि त्यानुसार समाजामध्ये असलेल्या रुढी-परंपराही बदलू लागल्या. यापैकी काही जुन्या परंपरा कालांतराने मागे पडू लागल्या. या साऱ्या बदलांमध्ये स्त्रियांना स्वातंत्र्यही मिळाले. संस्कृतीच्या नावाखाली त्यांच्यावर वर्षानुवर्ष जो पगडा होता तोदेखील कमी झाला. स्त्रियांना जगात वावरायची मोकळीक मिळू लागली. त्यांचे हक्क, अधिकार याविषयी त्या बोलू लागल्या आणि यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास हळुहळु द्विगुणित होऊ लागला. मात्र स्त्रियांना हे स्वातंत्र्य सगळीकडेच मिळालं असं नाही. या साऱ्यामध्ये असाही एक देश आहे जेथे अजूनही स्त्रियांना त्यांच्या मुलभूत हक्कासाठी संघर्ष करावा लागतो. सौदी अरेबिया या देशामध्ये महिलांवर २१ व्या शतकातही अनेक बंधनं लादण्यात आली आहेत.

जवळजवळ तीन दशकानंतर सौदीमधल्या स्त्रियांना मोठा संघर्ष केल्यानंतर गाडी चालविण्याचा अधिकार मिळाला आहे. गाडी चालविण्याचा अधिकार जरी या महिलांना मिळाला असला तरी त्यांच्या मुलभूत हक्कांची मात्र पायमल्ली होताना दिसून येते.

१. बॅक खाते उघडणे आहे बंधनकारक – आजच्या काळातही सौदीमधील महिला आर्थिकरित्या स्वतंत्र नसून साधे बॅंकेचे खाते उघडण्यासाठीही त्यांना पुरुषांच्या मदतीची गरज लागते. येथील महिलांना बॅकेत जाऊन खातं सुरु करण्याचा अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे जर महिलांना बॅंकेचं खाते सुरु करायचं असेल तर त्यांना घरातील पुरुषांची परवानगी घ्यावी लागते

२. पारपत्र तयार करण्यासाठीही हवी परवानगी – विमानसेवेने प्रवास करायचा असेल तर प्रत्येक प्रवाशाला पारपत्र तयार करणं बंधनकारक आहे. मात्र सौदीमधील महिला त्यांच्या इच्छेनुसार पारपत्र तयार करु शकत नाही. त्यांना यासाठी वडील, भाऊ किंवा पती यापैकी कोणत्याही एका पुरुषाची परवानगी घेणं आवश्यक आहे. तसेचं त्या एकट्या घराबाहेर पडू शकत नाही त्याच्याबरोबर एखादा पुरुष असेल तरच या महिला घराबाहेर पडू शकतात.

३. लग्न,घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही – सध्याच्या काळात महिला त्यांचे निर्णय स्वत: घेतात. मग ते लग्न असो वा नोकरी. परंतु सौदीमधील महिलांना लग्न करणं किंवा नव-यापासून घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या महिलांना त्यांच्या मनाविरुद्ध घरातील जाच सहन करत नव-याबरोबर संसार करावा लागतो. तसेच तिच्या मर्जीने ती एखाद्या पुरूषाबरोबर लग्न करु शकत नाही.

४. परपुरुषाबरोबर बोलण्याचा अधिकार नाही- येथील महिला नातेवाईक किंवा घरातील पुरुष मंडळींव्यतिरिक्त बाहेरच्या अन्य कोणत्याही पुरुषाबरोबर बोलू शकत नाहीत. त्यामुळे मित्रपरिवारातील पुरुषांबरोबर येथील महिलांना हॉटेलमध्ये जेवण्याची परवानगी नाही. विशेष म्हणजे येथील हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या दारातून प्रवेश करावा लागतो.

५. मनानुसार कपडे घालण्याचं स्वातंत्र नाही- येथील महिलांना इस्लामिक कायद्यानुसार ड्रेस कोड देण्यात आला आहेत. त्यामुळे या महिलांना संपूर्ण शरीर झाकलं जाईल असेचं कपडे घालावे लागतात.

६. संपत्तीमध्ये वाटा नाही- येथील महिलांना वारसा हक्कानुसार मिळणा-या संपत्तीमध्ये वाटा मिळत नाही. त्यामुळे त्यांना आई-वडीलांकडून कोणतीही संपत्ती मिळत नाही.